यशया
धडा 64
जर तू आकाश फाडून खाली पृथ्वीवर उतरलास तर प्रत्येक गोष्ट बदलेल. डोंगर तुझ्यासमोर वितळतील.
2 जळणाऱ्या झुडुपांप्रमाणे डोंगर जळतील. विस्तवावरच्या पाण्याप्रमाणे डोंगराला उकळी फुटेल. मग तुझ्या शत्रूंना तुझ्याबद्दल कळेल. तुला पाहिल्याबरोबर सर्व राष्ट्रे भीतीने कापू लागतील.
3 पण तू हे करावेस असे आम्हाला खरोखरच वाटत नाही. डोंगर तुझ्यासमोर वितळतील.
4 तुझ्या लोकांनी, खरोखर कधीच, तुझे ऐकले नाही, तू सांगितलेल्या गोष्टींकडे कधीच खरोखर लक्ष दिले नाही. कोणीही तुझ्यासारखा देव अजून पाहिला नाही. तुझ्याशिवाय दुसरा देव नाही-फक्त तूच आहेस. लोकांनी संयम पाळल्यास आणि तुझ्या मदतीची वाट पाहिल्यास, तू त्यांच्यासाठी महान गोष्टी करशील.
5 जे लोक सत्कृत्यात आनंद मानतात, त्यांच्याबरोबर तू असतोस. ते लोक तुझ्या चालीरीतींची आठवण ठेवतात. पण देवा, पूर्वी आम्ही तुझ्याविरूध्द जाऊन पाप केले म्हणून तू आमच्यावर रागावलास. आता, आमचे रक्षण कसे होणार?
6 आम्ही सगळे पापांनी मळीन झालो आहोत. आमचा सर्व चांगुलपणा जुन्या मळलेल्या कपड्यांप्रमाणे आहे. आम्ही सर्व पिकल्या पानांप्रमाणे आहोत. आमच्या पापांनी आम्हाला, वारा जसा पाचोळा दूर वाहून नेतो, तसे दूर नेले आहे.
7 आम्ही तुझी उपासना करत नाही. आम्ही तुझ्या नांवावर विश्वास ठेवत नाही. तुला अनुसरण्यासाठी आम्ही उत्सुक नाही म्हणून तू आमच्याकडे पाठ फिरविलीस. आम्ही तुझ्यापुढे असहाय्य आहोत. कारण आम्ही पापी आहोत.
8 पण, परमेश्वरा, तू आमचा पिता आहेस. आम्ही मातीप्रमाणे आहोत आणि तू कुंभार आहेस. तुझ्या हातांनी आम्हाला घडविले आहे.
9 परमेश्वरा, सतत आमच्यावर रागावू नकोस. आमची पापे कायमची लक्षात ठेवू नकोस. कृपया आमच्याकडे लक्ष दे. आम्ही तुझी माणसे आहोत.
10 तुझ्या पवित्र नगरी ओस पडल्या आहेत. त्या आता वाळवंटाप्रमाणे झाल्या आहेत. सियोनचे वाळवंट झाले आहे. यरूशलेमचा नाश झाला आहे.
11 आमचे पवित्र मंदिर जाळले गेले आहे. ते आमच्या दृष्टीने महान होते. आमच्या पूर्वजांनी तेथे तुझी पूजा केली. आमच्या सर्व चांगल्या गोष्टींचा आता नाश झाला आहे.
12 तुझे आमच्याबद्दलचे प्रेम दाखविण्यापासून, ह्या गोष्टी, तुला नेहमीच दूर ठेवतील का? तू असाच सतत गप्प राहशील का? तू कायमच आम्हाला शिक्षा करशील का?