यशया
धडा 50
परमेश्वर म्हणतो, “इस्राएलच्या लोकांनो, मी, तुमची आई यरूशलेमला, घटस्फोट दिला असे तुम्ही म्हणता. पण मी तिला घटस्फोट दिला हे सिध्द करणारे कायदेशीर कागदपत्रे आहेत का? माझ्या मुलांनो, मी कोणाचे पैसे देणे लागतो का? कर्ज फेडण्यासाठी मी तुम्हांला विकले का? नाही. तुम्ही केलेल्या दुष्कृत्यांमुळे मी तुम्हाला देऊन टाकले. तुमच्या आईने केलेल्या पापांमुळे मी तिला दूर केले.
2 मी घरी आलो तर घरी कोणीच नव्हते. मी खूप हाका मारल्या पण कोणीच उत्तर दिले नाही. मी तुमचे रक्षण करू शकणार नाही असे तुम्हाला वाटते का? तुमच्या सर्व संकटातून वाचविण्याचे सामर्थ्य माझ्यापाशी आहे. बघा! जर मी समुद्राला वाळून जाण्याची आज्ञा दिली, तर तो वाळून जाईल. मग पाणी नसल्याने मासे मरतील आणि त्यांना दुर्गंधी सुटेल.
3 मी आकाश काळे करू शकतो. मी काळोखाने आकाश शोकप्रदर्शक कपड्याइतके काळे करू शकतो.”
4 परमेश्वर, माझ्या प्रभूने, मला शिकविण्याची क्षमता दिली. तेव्हा आता या दु:खी लोकांना मी शिकवितो. रोज सकाळी तो मला उठवितो व विद्यार्थ्याप्रमाणे शिकवितो.
5 परमेश्वर, माझा प्रभू, मला शिकायला मदत करतो आणि मीही त्याच्याविरूध्द कधी गेलो नाही. मी त्याला अनुसरण्याचे सोडणार नाही.
6 मी त्या लोकांना मला मारू देईन. मी माझ्या दाढीचे केस त्यांना ओढू देईन. ते जेव्हा माझी निंदा करतील आणि माझ्या तोंडावर थुकंतील तेव्हा मी माझे तोंड लपविणार नाही.
7 परमेश्वर माझा प्रभु मला मदत करील. म्हणूनच लोकांनी माझी निंदा केली तरी मला त्रास होणार नाही. मी भक्कम होईन. माझी निराशा होणार नाही हे मला माहीत आहे.
8 परमेश्वर माझ्या पाठीशी आहे. मी निष्पाप आहे हे तो जाणतो, म्हणून मी अपराधी आहे असे कोणीही म्हणू शकणार नाही. मी चुकत आहे असे कोणाला सिध्द करावेसे वाटत असेल तर त्याने माझ्याकडे यावे. आपण परीक्षा पाहू.
9 पण लक्षात ठेवा, माझा प्रभु मला मदत करतो. म्हणून कोणीही मला पापी ठरवू शकणार नाही. ते सर्व लोक जीर्ण जुन्या वस्त्राप्रमाणे होतील. कसर त्यांना खाईल.
10 परमेश्वराला मानणारे लोक परमेश्वराच्या सेवकाचे ऐकतात. तो सेवक, काय घडणार आहे हे माहीत नसताना, पूर्णपणे देवावर विश्वास ठेवून जगतो. त्याला देवाच्या नावाबद्दल खात्री वाटते आणि तो त्यावर अवलंबून राहातो.
11 “पाहा! तुम्ही लोक स्वत:च्या इच्छेप्रमाणे राहू इच्छिता. तुम्ही स्वत:चा अग्नी पेटविता आणि मशाली पाजळता. तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे राहा. पण तुम्हाला शिक्षा होईल. स्वत:च पेटविलेल्या आगीत तुम्ही पडाल आणि जळाल. मी हे घडवून आणीन.”