ईयोब
धडा 4
तेमानच्या अलिफाजाने उत्तर दिले:“मी काहीतरी बोललेच पाहिजे. मी जर काही म्हटले तर तू अस्वस्थ होशील का?”
2
3 ईयोब, तू खूप लोकांना शिकवलं आहेस. अशक्त हातांना तू शक्ती दिली आहेस.
4 खाली पडणाऱ्या लोकांना तू तुझ्या शब्दांनी सावरले आहेस. ज्यांच्यात स्वत:हून उभे राहण्याचे बळ नव्हते त्यांना तू सबळ केले आहेस.
5 पण आता तुझ्यावर संकटे आली असताना तू खचला आहेस. संकटे कोसळल्यावर तू कष्टी झाला आहेस.
6 तू देवाची भक्ती करतोस. तुझा त्याच्यावर विश्वास आहे. तू चांगला माणूस आहेस आणि तीच तुझी आशा असू दे.
7 “ईयोब, तू याचा विचार कर. निष्पाप माणसाचा कधी नाश केला गेला नाही. चांगल्या लोकांचा कधीच नि:पात होत नाही.
8 मला काही अन्यायी आणि आयुष्य कष्टी करणारे लोक माहित आहेत, पण अशा लोकांना नेहमी शासन होते.
9 असे लोक देवाच्या शिक्षेमुळे मारले जातात. देवाचा क्रोध त्यांना नष्ट करतो.
10 वाईट लोक सिंहासारखी गर्जना करतात आणि गुरगुर करतात. परंतु देव त्यांना मुके करतो आणि त्यांचे दात पाडतो.
11 हे वाईट लोक ठार मारण्यासाठी ज्यांना कोणी प्राणी मिळत नाही अशा सिंहाप्रमाणे असतात. ते मरतात आणि त्यांची मुले इतस्तत: भटकत राहातात.
12 “माझ्याकडे गुप्तपणे एक निरोप आला आणि माझ्या कानी त्याची कुजबुज पडली.
13 त्यामुळे एखाद्या भयंकर स्वप्नाने झोप चाळवावी तशी माझी झोप चाळवली गेली.
14 मी घाबरलो. माझा थरकाप झाला. माझी सगळी हाडे थरथर कापू लागली.
15 एक आत्मा अगदी माझ्या चेहऱ्याजवळून गेला आणि माझ्या शरीरावरचे सगळे केस उभे राहिले.
16 तो आत्मा निश्र्चल उभा राहिला पण ते काय होते ते मला दिसू शकले नाही. माझ्या डोळ्यांसमोर एक आकार होता आणि सर्वत्र शांतता होती. आणि नंतर मला एक हलका आवाज ऐकू आला:
17 ‘देवापेक्षा माणूस जास्त बरोबर असू शकत नाही. माणूस त्याच्या निर्मात्यापेक्षा अधिक पवित्र असू शकत नाही.
18 हे बघा, देव त्याच्या स्वर्गातील दूतांवर देखील विश्वास टाकू शकत नाही. त्याला स्वत:च्या दूतांमध्ये सुध्दा काही दोष आढळतात.
19 तेव्हा माणसे नक्कीच वाईट आहेत. ते मातीच्या घरात राहातात (म्हणजे त्यांचे शरीर नाशवंत आहे) आणि या मातीच्या घरांचा पाया मातीतच असतो. ते पतंगापेक्षाही (किड्यापेक्षाही) अधिक सहजतेने चिरडले जातात.
20 माणसे सकाळपासून संध्याकाळपर्यंत मरत असतात आणि ते कोणाच्या लक्षातही येत नाही. ते मरतात आणि कधीच परत न येण्यासाठी निघून जातात.
21 त्यांच्या तंबूच्या दोन्या वर खेचल्या जातातआणि ते शहाणपणा न मिळवताच मरतात.’