ईयोब

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42


धडा 35

अलीहूने आपले बोलणे चालू ठेवले.तो म्हणाला:
2 “ईयोब, ‘मी देवापेक्षा अधिक बरोबर आहे’ हे तुझे म्हणणे योग्य नाही.
3 आणि ईयोब तू देवाला विचारतोस ‘जर एखाद्या माणसाने देवाला खुश करण्याचा प्रयत्न केला तर त्याला काय मिळेल? मी जर पाप केले नाही तर त्यामुळे माझे काय चांगले होणार आहे?’
4 “ईयोब, मी (अलीहू) तुला आणि तुझ्या मित्रांना उत्तर देण्याची इच्छा करतो.
5 ईयोब, तुझ्यापेक्षा उंच असणाऱ्या आकाशाकडे, ढगांकडे बघ.
6 ईयोब, तू पाप केलेस तर त्यामुळे देवाला कसली इजा होत नाही. तुझ्याकडे पापांच्या राशी असल्या तरी त्यामुळे देवाला काही होत नाही.
7 आणि ईयोब, तू खूप चांगला असलास तरी त्यामुळे देवाला कसली मदत होत नाही. देवाला तुझ्याकडून काहीच मिळत नाही.
8 ईयोब, तू ज्या चांगल्या आणि वाईट गोष्टी करतोस त्यांचा परिणाम तुझ्यावर आणि तुझ्यासारख्या इतरांवर होतो. त्यामुळे देवाला मदत होते किंवा त्याला दु:ख होते असे नाही.
9 “जर वाईट लोकांना दु:ख झाले तर ते मदतीसाठी ओरडतील. ते सामर्थ्यवान लोकांकडे जातात आणि मदतीची याचना करतात.
10 परंतु जे वाईट लोक देवाकडे मदत मागत नाहीत. ते असे म्हणणार नाहीत: ‘मला निर्माण करणारा देव कुठे आहे? लोक दु:खी कष्टी असले की देव त्यांना मदत करतो. आता तो कुठे आहे?’
11 ‘देवाने आम्हाला पशुपक्ष्यांपेक्षा शहाणे बनवले आहे तेव्हा तो कुठे आहे?’
12 “किंवा त्या वाईट माणसांनी देवाकडे मदत मागितली तरी देव त्यांना उत्तर देणार नाही. का? कारण ते लोक अतिशय गर्विष्ठ आहेत आपण फार मोठे आहोत. असे त्यांना अजूनही वाटते.
13 देव त्यांच्या तुच्छ याचनेकडे लक्ष देणार नाही हे खरे आहे. सर्वशक्तिमान देव त्यांच्याकडे लक्ष देणार नाही.
14 तेव्हा ईयोब, तू जेव्हा असे म्हणशील की देव तुला दिसत नाही तेव्हा देव तुझ्याकडे लक्ष देणार नाही. तू देवाला भेटण्याची आणि त्याला तू निरपराध आहेस हे पटवून देण्याच्या संधीची वाट पहात आहेस असे म्हण.
15 “ईयोब, देव वाईट लोकांना शिक्षा करत नाही असे तुला वाटते. तो पापाकडे लक्ष देत नाही असेही तुला वाटते.
16 म्हणून ईयोब त्याचे निरर्थक बोलणे चालूच ठेवतो. आपण खूप मोठे असल्याचा आव ईयोब आणतो. परंतु आपण काय बोलत आहोत हे ईयोबला कळत नाही हे सहजपणे समजून येते.”