रोमकरांस

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16


धडा 10

बंधूनो, इस्राएलाच्या वतीने माझी मनीषा आणि देवाजवळ प्रार्थना आहे की,
2 त्यांचे तारण व्हावे, कारण मी त्यांच्याविषयी साक्ष देतो की, त्यांना देवाविषयी कळकळ आहे, परंतु ती ज्ञानावर आधारित नाही.
3 देवापासून मिळणाऱ्या नीतिमत्वाविषयी त्यांना माहिती नसल्यामुळे ते आपलेच नीतिमत्व स्थापावयास पाहत होते. त्यामुळे ते देवाच्या नीतिमत्वाला वश झाले नाहीत.
4 कारण ख्रिस्त नियमशास्त्राचा शेवट आहे यासाठी की, जे विश्वास ठेवतात त्यांना नीतिमत्व मिळावे.
5 नियमशास्त्राद्वारे मिळणाऱ्या नीतिमत्वाविषयी मोशे लिहितो, “जो मनुष्य या गोष्टी करतो तो त्याकडून जगेल.”
6 विश्वासाने मिळणारे नीतिमत्व हे सांगते, “तुम्ही आपल्या मनात म्हणू नका की स्वर्गात कोण जाईल? (म्हणजे ख्रिस्ताला खाली आणावयास)
7 किंवा “खाली अधोलोकात कोण जाईल? (म्हणजे ख्रिस्ताला मेलेल्यातून वर आणायला).
8 नाही! शास्त्र काय म्हणते? “ते वचन तुमच्याजवळ, तुमच्या मुखात, तुमच्या अंत:करणात आहे.”ते वचन हे आहे
9 की, जर तू तुझ्या मुखाने “येशू प्रभु आहे” असा विश्वास धरतोस आणि आपल्या अंत:करणात देवाने त्याला मेलेल्यांतून उठविले असा विश्वास धरतोस तुझे तारण होईल
10 कारण नीतिमत्वासाठी मनुष्य अंत:करणाने विश्वास ठेवतो आणि तारणासाठी विश्वासाने कबूल करतो.
11 शास्त्र सांगते, “जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो लज्जित होणार नाही.”
12 याचे कारण की, यहूदी आणि ग्रीक यांच्यात भेद नाही. कारण प्रभु हा सर्वांचा प्रभु आहे. जे हाक मारतात त्या सर्वांवर दया करण्या इतका तो संपन्र आहे.
13 कारण “जे कोणी प्रभूचे नाव घेऊन हाक मारतील, त्यांचे तारण होईल.”
14 परंतु ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याला हाक मारणे त्यांना कसे शक्य होईल? ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर विश्वास ठेवणे त्यांना कसे शक्य होईल? आणि जर कोणी त्यांना उपदेश केला नाही, तर ते कसे ऐकतील?
15 त्यांना पाठविले नाही तर उपदेश करणे त्यांना कसे शक्य होईल? असे लिहिले आहे की, “शुभवार्ता आणणाऱ्याचे पाय किती सुंदर आहेत!
16 परंतु सर्वच यहूद्यांनी ती शुभवार्ता स्वीकारली नाही. यशयाने म्हटल्याप्रमाणे “प्रभो, आम्ही ज्या गोष्टी त्यांना सांगितल्या, त्यावर कोणी विश्वास ठेवला?”
17 म्हणून जे ऐकले त्याचा परिणाम विश्वास आणि जेव्हा कोणी येशूविषयी उपदेश केला.
18 परंतु मी म्हणतो, “त्यांनी आमचा उपदेश ऐकला नव्हता काय? “होय, त्यानी ऐकला: आत्मा म्हणतो:“त्यांच्या आवाजाचा नाद सर्व पृथ्वीवर गेला आहे आणि त्यांचे शब्द पृथ्वीच्या शेवटापर्यंत गेले आहेत.”स्तोत्र. 11:4
19 परंतु मी म्हणातो, “इस्राएल लोकांना कळले नव्हते काय?” होय, त्यांना कळले, प्रथम मोशे म्हणतो,“खरे तर ज्या लोकांचे राष्ट्र नाही त्यांचा उपयोग करुन मी तुम्हांला मत्सरी करीन. विश्वासहीन राष्ट्राचा उपयोग करुन मी तुम्हांला राग आणीन.”
20 नंतर यशया फार धीट होऊन म्हणतो,“जे मला शोधीत नव्हते त्यांना मी सापडलो, जे माझी चौकशी करीत नसत त्यांना मी प्रगट झालो.”यशया 65:1
21 परंतु देव इस्राएल लोकांविषयी म्हणतो, “ज्या लोकानी माझी आज्ञा मोडली, आणि मला विरोध केला त्यांच्याकडे सर्व दिवसभर मी आपले हात पसरले आहेत.”