लूक

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24

0:00
0:00

धडा 21

येशूने वर पाहिले व श्रीमंत लोकांना दानपेटीत दाने टाकताना न्याहाळले.
2 त्याने एका गरीब विधवेलाही तांब्याची दोन नाणी टाकताना पाहिले.
3 तेव्हा तो म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो, या गरीब विधवेने इतर सर्वांपेक्षा अधिक टाकले. (मी असे म्हणतो)
4 कारण या सर्व लोकांनी आपल्या भरपूर संपत्तीमधून काही भाग दान म्हणून टाकले. परंतु तिने गरीब असून आपल्या उपजीविकेतील सर्वच टाकले.
5 शिष्यातील काही जण मंदिराविषयी असे बोलत होते की, ते सुंदर पाषाणांनी आणि नवसाच्या अर्पणांनी सुशोभित केले आहे. येशू म्हणाला,
6 “या गोष्टी तुम्ही पाहताना असे दिवस येतील की, एकावर एक असा एकही दगड ठेवला जाणार नाही. ते सर्व पाडले जातील.”
7 त्यांनी त्याला प्रश्न विचारला आणि ते म्हणाले, “गुरुजी या गोष्टी केव्हा घडतील? व या गोष्टी घडणार आहेत यासंबंधी कोणते चिन्ह असेल?”
8 आणि तो म्हणाला, “तुम्हांला कोणी फसवू नये म्हणून सावध राहा. कारण माझ्या नावाने पुष्कळ येतील आणि तो “मी आहे’ असे म्हणतील. आणि ते म्हणतील, “वेळ जवळ आली आहे.’ त्यांच्यामागे जाऊ नका!
9 जेव्हा तुम्ही लढाया व दंगे याविषयी ऐकाल तेव्हा घाबरु नका. कारण या गोष्टी घडल्याच पाहिजेत. पण एवढ्यात शेवट होणार नाही.”
10 मग तो त्यांना म्हणाला, “एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर उठेल, एक राज्य दुसऱ्या राज्यावर उठेल.
11 मोठे भूंकप होतील, दुष्काळ पडतील, आणि वेगवेगळ्या ठिकाणी पीडा उद्भवतील, भितीदायक घटना घडतील. आणि आकाशात मोठी चिन्हे घडतील.
12 परंतु हे सर्व होण्यापूर्वी ते तुम्हांला अटक करतील. ते तुमचा छळ करतील. चौकशीसाठी ते तुम्हांस सभस्थानांसमोर उभे करतील आणि तुरुंगात टाकतील. माझ्या नावासाठी ते तुम्हांला राजे व राज्यपाल यांच्यासमोर नेतील.
13 यामुळे तुम्हांला माझ्याविषयी साक्ष देण्याची संधी मिळेल.
14 “आपला स्वत:चा बचाव कसा करायचा याविषयी काळजी करायची नाही अशी मनाची तयारी करा,
15 कारण मी तुम्हांला असे शब्द व अशी बुद्धी देईन की ज्यामुळे त्यांना तुमचा विरोध करायला किंवा तुमच्याविरुद्ध बोलायला मुळीच जमणार नाही.
16 “परंतु आईवडील, भाऊ, नातेवाईक आणि मित्र तुमचा विश्वासघात करतील आणि तुम्हांपैकी काही जणांना ठार मारतील.
17 माझ्या नावामुळे सर्व जण तुमचा द्वेष करतील.
18 परंतु तुमच्या डोक्यावरील एक केसही नाहीसा होणार नाही.
19 आपल्या सहनशीलतेने तुम्ही जिवाचे रक्षण कराल.
20 जव्हा तुम्ही यरुशलेमाला सैन्यानी वेढा घातलेला पाहाल, तेव्हा तुम्हांला कळून येईल की, तिचा नाश होण्याची वेळ आली आहे.
21 जे यहूदीयात आहेत त्यांनी डोंगरांमध्ये पळून गेले पाहिजे. जे रानात आहेत त्यांनी शहरात जाऊ नये.
22 ज्या सर्व गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या पूर्ण होण्यासाठी हे शिक्षेचे दिवस आहेत.
23 त्या दिवसांत ज्या गरोदर स्रिया आहेत, व ज्या बाळाचे पोषण करणाऱ्या स्रिया आहेत, त्यांच्यासाठी ते किती भयंकर होईल. अशा स्त्रियांची खरोखर दुर्दशा होईल. मी असे म्हणतो कारण देशावर मोठे संकट येईल आणि लोकांवर देवाचा कोप ओढवेल.
24 ते तरवारीच्या धारेने पडतील आणि त्यांना बंदीवान करुन राष्ट्रांत नेतील आणि यहूदीतर लोकांचा काळ संपेपर्यंत यहूदीतर राष्ट्रे यरुशलेम पायाखाली तुडवतील.
25 “सूर्य, चंद्र, तारे यांच्यात चिन्हे होतील, पृथ्वीवरील राष्ट्रे हतबल होतील व समुद्राच्या गर्जणाऱ्या लाटांनी ते घाबरुन जातील.
26 भीतीमुळे लोक बेशुद्ध होतील आणि जगात काय घडणार आहे ह्या धास्तीमुळे व भीतिमुळे लोक दुर्बल होतील. आकाशातील सामर्थ्ये डळमळीत होतील.
27 नंतर ते मनुष्याच्या पुत्राला सामर्थ्याने आणि वैभवाने मेघात येताना पाहतील.
28 मग या गोष्टी घडण्यास आरंभ होईल, तेव्हा सरळ उभे राहा. आणि तुमचे मस्तक वर करा, कारण तुमच्या सुटकेची वेळ जवळ येत आहे.”
29 नंतर त्याने त्यांस एक बोधकथा सांगितली: “अंजिराच्या झाडाकडे व इतर दुसऱ्या सर्व झाडांकडे पाहा.
30 त्यांना पालवी येऊ लागली की, तुमचे तुम्हीच समजता की, उन्हाळा अगदी जवळ आला आहे.
31 त्याचप्रमाणे या गोष्टी घडताना तुम्ही पाहाल तेव्हा ओळखा की देवाचे राज्य जवळ आले आहे.
32 मी तुम्हांस खरे सांगतो की, ह्या सर्व गोष्टी घडून येईपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही.
33 आकाश व पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचने नाहीशी होणार नाहीत.
34 सावध राहा, दारुबाजी आणि अधाशीपणात तुमचा वेळ घालवू नका, किंवा ऐहिक गोष्टींमध्ये मग्न राहू नका. जर तुम्ही तसे कराल, तर तुम्ही व्यवस्थित विचार करु शकणार नाही, व तुम्ही तयार नसताना तो दिवस (शेवट) अकस्मात तुमच्यावर येईल.
35 खरोखर, तो पृथ्वीवर असणाऱ्या सर्व जिवंतांवर येईल.
36 सर्व समची जागृत राहा. होणाऱ्या सर्व गोष्टींपासून जिवंत राहण्यासाठी आणि विश्वासाने मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहणे शक्य व्हावे यासाठी प्रार्थना करा.”
37 दर दिवशी तो मंदिरात शिक्षण देत असे. परंतु रात्री मात्र तो जैतूनाचा डोंगर म्हटलेल्या टेकडीवर जात असे.
38 सर्व लोक मंदिरात जाण्यासाठी व त्याचे ऐकण्यासाठी पहाटेस उठून त्याच्याकडे जात.