यिर्मया
धडा 27
यिर्मयाला परमेश्वराचा संदेश आला. यहूदाचा राजा सिद्कीया ह्याच्या कारकिर्दीच्या चौथ्यावर्षी हा संदेश आला. सिद्कीया योशीया राजाचा मुलगा होता.
2 परमेश्वर मला म्हणाला, “यिर्मया, पट्ट्या आणि बांबू यांच्यापासून जोखड तयार कर. ते तुझ्या मानेवर ठेव.
3 मग यहूदाचा राजा सिद्कीया ह्याला भेटण्यासाठी यरुशलेमला अदोम, मवाब, अम्मोन, सोरा व सीदोन ह्या राजांचे जे दूत येतात, त्यांच्या हाती ह्या सर्व राजांना निरोप पाठव.
4 त्या दूतांना त्यांच्या स्वामींना असा निरोप द्यायला सांग की सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, ‘तुमच्या राजांना सांगा
5 मी ही पृथ्वी व त्यावरील सर्व माणसे निर्माण केली. मी पृथ्वीवर सर्व प्राणी निर्माण केले. मी माझ्या प्रचंड सामर्थ्याच्या साहाय्याने आणि बळकट हाताने हे निर्माण केले. मी मला पाहिजे त्याला ही पृथ्वी देईन.
6 सध्या मी तुमचे सर्व देश बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्या स्वाधीन केले आहेत. तो माझा सेवक आहे. मी वन्य प्राण्यांनासुद्धा त्याचा हूकूम पाळायला लावीन.
7 सर्व राष्ट्रे, नबुखद्नेस्सर, त्याचा मुलगा आणि नातू ह्यांचे दास्य करतील. मग बाबेलच्या पराभवाची वेळ येईल. खूप राष्ट्रे आणि मोठे राजे बाबेलला त्याचा दास करतील.
8 “पण आता, काही राष्ट्रे वा राज्ये बाबेलच्या राजा नबुखद्नेस्सर ह्याचे दास्य करण्यास कदाचित् नकार देतील. ते त्याचे जोखड आपल्या मानेवर ठेवण्यास कदाचित् तयार होणार नाहीत. असे झाल्यास मी काय करीन माहीत आहे? मी त्या राष्ट्रांवर युद्ध, उपासमार व भयंकर रोगराई ह्या आपत्ती आणून त्यांना शिक्षा करीन.” हा परमेश्वराचा संदेश आहे. “त्या राष्ट्रांचा नाश होईपर्यंत मी हे करीन. नबुखद्नेस्सरच्या विरुद्ध लढणाऱ्या राष्ट्रांचा नाश मी त्याच्याच हातून करीन.
9 तेव्हा तुम्ही तुमच्या संदेष्ट्यांचे ऐकू नका. भविष्य सांगण्यासाठी जादूचा उपयोग करणाऱ्या लोकांचे ऐकू नका. स्वप्नांचे अर्थ लावणाऱ्या लोकांचे ऐकू नका. मृतांशी बोलणाऱ्या व जादू करणाऱ्या लोकांचे ऐकू नका. हे सर्वजण तुम्हाला “तुम्ही बाबेलच्या राजाचे दास होणार नाही’ असे सांगतात.”
10 पण ते खोटे बोलत आहेत. तुमच्या जन्मभूमीपासून तुम्हाला दूर नेण्यास ते कारणीभूत होतील. मी तुम्हाला तुमची घरे सोडायला भाग पाडीन. तुम्ही दुसऱ्या देशात मराल.
11 “‘पण बाबेलच्या राजाच्या जोखडात आपल्या माना अडकविणारी व त्याचा हूकूम मानणारी राष्ट्रे जगतील. मी त्या राष्ट्रांना त्यांच्याच भूमीवर राहू देईन आणि बाबेलच्या राजाची सेवा करु देईन.”‘ हा देवाकडून आलेला संदेश आहे. “त्या राष्ट्रांतील लोक त्यांच्याच भूमीत राहून ती पिकवतील.
12 “‘यहूदाचा राजा सिद्कीया ह्याला मी असाच संदेश दिला. मी म्हणालो, “सिद्कीया, तुला तुझी मान बाबेलच्या राजाच्या जोखडात अडकवलीच पाहिजे आणि त्याचा हुकूम मानला पाहिजे. तू, बाबेलचा राजा आणि त्याची प्रजा, ह्यांची सेवा केलीस, तरच तू जगशील.
13 जर तू बाबेलच्या राजाची सेवा करण्यास तयार झाला नाहीस, तर तू आणि तुझी प्रजा शत्रूचा हल्ला, उपासमार व रोगराई ह्यांनी मराल. परमेश्वर म्हणतो की जे बाबेलच्या राजाची सेवा करण्याचे नाकारतील त्यांच्याबाबातीत ह्या गोष्टी घडतीलच.
14 पण खोटे संदेष्टे सांगतात की तुम्हाला कधीच बाबेलचे गुलाम व्हावे लागणार नाही.“त्यांचे मुळीचे ऐकू नका. कारण ते तुम्हाला खोटा उपदेश करतात.
15 मी त्या संदेष्ट्यांना पाठविलेले नाही.” हा परमेश्वराचा संदेश आहे. “ते खोटे सांगतात व तो माझा संदेश आहे असे म्हणतात म्हणून मी तुम्हा लोकांना दूर पाठवीन. तुम्ही मराल आणि तुम्हाला खोटे सांगणारे ते संदेष्टेही मरतील.”
16 नंतर मी (यिर्मया) याजकांना व सर्व लोकांना म्हणालो, “परमेश्वर म्हणतो ते खोटे संदेष्टे म्हणतात ‘खास्द्यांनी परमेश्वराच्या मंदिरातून खूप गोष्टी घेतल्या आहेत. त्या सर्व लवकरच परत आणल्या जातील. ते संदेष्टे खोटे सांगतात.’ म्हणून त्यांचे ऐकू नका.
17 त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. बाबेलच्या राजाची सेवा करा. तुमच्या शिक्षेचा स्वीकार करा म्हणजे तुम्ही जगाल. या यरुशलेम नगरीच्या नाशास तुम्ही कारणीभूत होण्याचे काहीच कारण नाही.
18 ते जर खरेच संदेष्टे असतील आणि त्यांना परमेश्वराकडून खराच संदेश मिळाला असेल, तर त्यांना प्रार्थना करु द्या. ज्या गोष्टी अजूनही परमेश्वराच्या मंदिरात आहेत, त्यासाठी त्यांना आळवणी करु द्या. राजवाड्यात अजूनही शाबूत असलेल्या गोष्टींसाठी त्यांना विनवणी करु द्या. यरुशलेममध्ये अजूनही शिल्लक असलेल्या गोष्टींसाठी त्या याजकांना प्रार्थना करु द्या. ह्या सर्व गोष्टी बाबेलला नेल्या जाऊ नयेत म्हणून त्यांना आळवणी करु द्या.”
19 यरुशलेम मध्ये अजूनही शिल्लक असलेल्या गोष्टींबद्दल सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणतो की मंदिरात अजूनही स्तंभ, काशाचे गंगाळ, हलविता येणाऱ्या बैठकी आणि इतर गोष्टी आहेत.
20 बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने ह्या गोष्टीयरुशलेममध्येच सोडून दिल्या. त्याने यहूदाचा राजा यकन्या ह्याला कैद करुन नेले, तेव्हा ह्या गोष्टी नेल्या नाहीत. यकन्या हा यहोयाकीम राजाचा मुलगा होता. नबुखद्नेस्सरने यहूदातील व यरुशलेममधील इतर महत्वाच्या व्यक्तींनासुद्धा नेले.
21 सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलच्या लोकांचा देव, परमेश्वराच्या मंदिरात राजवाड्यात आणि यरुशलेममध्ये अजून शिल्लक राहिलेल्या वस्तूंच्याबद्दल पुढीलप्रमाणे भाकीत करतो, “ह्या सर्व वस्तूसुध्दा बाबेलला नेल्या जातील.
22 मी त्या वस्तू परत आणायला जाईपर्यंत त्या बाबेलमध्येच राहीतल.” हा परमेश्वराचा संदेश आहे. “नंतर त्या गोष्टी मी परत आणीन. मी त्या पुन्हा ह्याच जागेवर ठेवीन.”