यिर्मया
धडा 17
“यहूदी लोकांची पापे, खोडता येणे शक्य नाही, अशा ठिकाणी लिहिली आहेत. ती लोखंडी लेखणीने दगडावर कोरली आहेत. हिरकणीचे टोक असलेल्या लेखणीने ती पाषाणावर कोरली आहेत. तो पाषाण म्हणजेच त्यांचे ह्दय होय. ती पापे वेदीच्या शिंगांवर कोरली आहेत.
2 खोट्या देवांना अर्पण केलेल्या त्या वेदी त्यांच्या मुलांना आठवतात. अशेरला अर्पण केलेले कालकडी खांब त्यांना आठवतात. टेकडीवरच्या व हिरव्या झाडाखालच्या त्या वस्तू त्यांना स्मरतात.
3 विस्तीर्ण प्रदेशातील डोंगरावरील त्या वस्तू त्यांना आठवतात यहूदी लोकांकडे बरीच संपत्ती आहे ती सर्व मी दुसऱ्या देशांना देईन. तुम्ही जेथे पूजाआर्चा करता आणि जे पाप आहे, अशी उच्च स्थाने दुसरे लोक नष्ट करतील.
4 मी तुम्हाला दिलेली भूमी तुम्ही गमवाल. मी तुमच्या शत्रूंना तुम्हाला गुलाम म्हणून अज्ञान भूमीत नेऊ देईन. का? कारण मी खूप संतापलो आहे. माझा संताप प्रखर अग्नीप्रमाणे आहे, त्यात तुम्ही कायमचे जळून भस्म व्हाल.”
5 परमेश्वर म्हणतो, “जे दुसऱ्या लोकांवर विश्वास ठेवतात, त्यांचे वाईट होईल. सामर्थ्यासाठी जे दुसऱ्यावर विसंबतात, त्याचे भले होणार नाही. का? कारण त्यांनी परमेश्वरावर विश्वास ठेवणे सोडून दिले.
6 ते लोक वाळवंटातील झुडुपाप्रमाणे होत. निर्जन, उष्ण आणि कोरड्या व वाईट जमिनीवरील झुडुपाप्रमाणे ते आहेत. देव किती भले करु शकतो, ह्याची त्या झुडुपाला जाणीव नाही.
7 परंतु परमेश्वरावर विश्वास ठेवणाऱ्यावर कृपादृष्टी होईल. का? कारण परमेश्वर विश्वासास प्रात्र आहे, ह्याची देव त्याला प्रचिती देईल.
8 तो माणूस पाण्याजवळ असलेल्या वृक्षाप्रमाणे बळकट होईल. त्या झाडाची मुळे लांब असल्याने त्याला पाणी मिळतेच. उष्ण दिवसांचे त्याला भय नसते. त्याची पाने नेहमीच हिरवी असतात. एखाद्या वर्षी पाऊस पडला नाही, तरी त्याला चिंता नसते. त्याला नेहमीच फळे धरतात.
9 “माणसाचे मन फार कपटी असते. त्याच्यावर काही औषध नाही. म्हणूनच कोणालाही मनाचे खरे आकलन होत नाही.
10 पण मी प्रत्यक्ष परमेश्वर असल्याने, मी माणसाच्या मनात डोकावू शकतो मी माणसाच्या मनाची परीक्षा घेऊ शकतो. प्रत्येकाला काय हवे ते मी ठरवू शकतो प्रत्येकाला त्याच्या कर्माचे योग्य फळ मी देऊ शकतो.
11 काही वेळा, एकादी पक्षीण स्वत: न घातलेले अंडे उबविते. धनासाठी जो माणूस फसवणूक करतो, तो ह्या पक्षिणी सारखाच असतो. अर्ध्या आयुष्यातच हा माणूस धन गमावेल. त्याच्या आयुष्याच्या सरत्या काळात तो दुष्ट म्हणून ओळखला जाईल.”
12 आरंभीपासून आमचे मंदिर म्हणजे देवासाठी एक भव्य आसन झाले आहे. ती महत्वाची वास्तू आहे.
13 परमेश्वरा, तू इस्राएलचे आशास्थान आहेस. तू पाण्याच्या जिवंत झऱ्याप्रमाणे आहेस. जो परमेश्वराला अनुसरणे सोडेल, त्याला लाजवले जाईल आणि त्याचे आयुष्य अल्प असेल.
14 परमेश्वरा, तू मला बरे केलेस, तर मी पूर्ण बरा होईन. तू मला वाचविलेस, तर मी खरोखच वाचेन. देवा, मी तुझी स्तुती करतो.
15 यहूदातील लोक मला सतत प्रश्र्न विचारतात. ते विचारतात, “यिर्मया, परमेश्वराच्या संदेशाचे काय? तो खरोखरीच खरा ठरतो का ते पाहू या.”
16 परमेश्वरा, मी तुला सोडून पळून गेलो नाही. मी तुला अनुसरलो. मी तुला पाहिजे तसा मेंढपाळ बनलो. तो भयंकर दिवस उजाडावा असे मला वाटत नव्हते. मी सांगितलेल्या गोष्टी परमेश्वरा तुला माहीतच आहेत. काय घडत आहे, ते तू पाहतोसच.
17 परमेश्वरा, माझा नाश करु नकोस. संकटकाळी, मला तुझा आधार वाटतो.
18 लोक मला त्रास देतात. त्यांना तू खजील कर. पण माझी निराशा करु नकोस. त्यांना धाक दाखव पण मला घाबरवू नकोस तो भयंकर अरिष्टाचा दिवस माझ्या शत्रूंवर आण आणि त्यांचा पुन्हा पुन्हा बिमोड कर.
19 परमेश्वराने मला पुढील गोष्टी सांगितल्या: “यिर्मया, यहूदाचे राजे यरुशलेमच्या ज्या प्रवेशद्वारातून ये - जा करतात, त्या लोकद्वारात जाऊन उभा राहा आणि लोकांना माझा सदेश सांग. मग यरुशलेमच्या इतर प्रवेशद्वारापाशी जाऊन हेच कर.
20 “त्या लोकांना सांग, ‘परमेश्वराचा संदेश ऐका. यहूदाच्या राजांनो आणि लोकांनो व यरुशलेमच्या प्रवेशद्वारांतून प्रवेश करणाऱ्या सर्वांनो, माझे ऐका.”
21 परमेश्वराने पुढील गोष्टी सांगितल्या आहेत: शब्बाथच्या दिवशी तुम्ही ओझे वाहणार नाही याची काळजी घ्या. त्या दिवशी, यरुशलेमच्या प्रवेशद्वारातून ओझी वाहून आणू नका.
22 त्या दिवशी, तुमच्या घरांतून ओझी बाहेर आणू नका. त्या दिवशी कोणतेही काम करु नका. तुम्ही शब्बाथचा दिवस एक पवित्र म्हणून पाळा. तुमच्या पूर्वजांना मी हीच आज्ञा केली होती.
23 पण त्यांनी ती पाळली नाही. त्यांनी माझ्याकडे लक्ष दिले नाही. तुमचे पूर्वज हटवादी होते. मी त्यांना शिक्षा केली, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. त्यांनी माझे ऐकले नाही.
24 पण तुम्ही माझी आज्ञा पाळण्याची काळजी घ्या.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “शब्बाथच्या दिवशी, यरुशलेमच्या प्रदेशद्वारातून, तुम्ही ओझी आणता कामा नये; शब्बाथचे पावित्र्य राखा. कोणतेही काम न करता तुम्ही हे करु शकता.
25 “तुम्ही जर ही आज्ञा पाळलीत, तर दावीदाच्या सिंहासनावर बसणारे राजे यरुशलेमच्या प्रदेशद्वारांतून येतील. ते रथांतून आणि घोड्यावरुन येतील. यहूदाचे आणि यरुशलेमचे नेते त्यांच्याबरोबर असतील. यरुशलेममध्ये लोक कायमचे वास्तव्य करतील.
26 यहूदाच्या शहरांतून लोक यरुशलेमला येतील, यरुशलेमच्या आजूबाजूच्या खेड्यातून, बन्यामीनच्या कुळातील लोक ज्या प्रदेशात राहतात,त्या प्रदेशातून, पश्र्चिमेच्या डोंगरपायथ्याच्या भागातून, डोंगराळ प्रदेशातून आणि नेगेवमधून लोक यरुशलेमला येतील, हे सर्व लोक होमार्पण, धान्यार्पण, धूप आणतील आणि कृतज्ञता व्यक्त करतील. ते हे सर्व परमेश्वराच्या मंदिरात आणतील.
27 “पण तुम्ही जर माझे ऐकले नाही अथवा माझी आज्ञा पाळली नाही, तर वाईट गोष्टी घडतील. जर तुम्ही शब्बाथच्या दिवशी ओझे वाहिले, तर तुम्ही त्या दिवसाचे पावित्र्य राखले नाही, असे होईल. मग कधींही विझू न शकणारी आग मी लावीन. यरुशलेमच्या प्रवेशद्वारापासून सुरु झालेली ही आग राजवाडे जाळेपर्यंत जळत राहील.”