याकोब

1 2 3 4 5


धडा 4

तुमच्यामध्ये भांडणे व झगडे कोठून येतात? तुमच्यामध्ये ज्या स्वार्थी भावना संघर्ष करतात त्यामधून ते येत नाही काय?
2 तुम्हांला काही गोष्टी पाहिजे असतात पण त्या तुम्हांला मिळत नाही, म्हणून तुम्ही खून करता व दुसऱ्या लोकांचा मत्सर करता पण तरीही तुम्हांला पाहिजे ते मिळत नाही. म्हणून तुम्ही भांडण व झगडे करता. तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी मिळत नाहीत कारण तुम्ही देवाला मागत नाही.
3 आणि जेव्हा तुम्ही मागता, तेव्हा तुम्हाला काहीही मिळत नाही, कारण तुम्ही चुकीच्या उद्देशाने मागता, यासाठी की तुम्हाला जे काही मिळेल ते तुमच्या स्वत:च्या सुखासाठी वापरता.
4 अप्रामाणिक लोकांनो, तुम्हाला हे माहीत नाही का की, जगाशी मैत्री हे देवाबरोबरचे वैर आहे. जो मनुष्य जगाशी मैत्री करतो तो देवाशी वैर करतो.
5 पवित्र शास्त्र सांगते त्यात काही अर्थ नाही काय? जेव्हा ते म्हणते, की देवाने जो आत्मा आमच्यात ठेवला आहे तो आमची हेव्याने वाट पाहतो.
6 पण देव आम्हांवर त्याहूनही मोठी कृपा करतो. त्यासाठीच पवित्र शास्त्र म्हणते, “देव गर्विष्ठाचा विरोध करतो, पण नम्र जनांवर तो दया करतो.”
7 म्हणून स्वत:ला देवाच्या स्वाधीन करा. सैतानाला विरोध करा. आणि तो तुमच्यापासून पळून जाईल.
8 देवाजवळ या, आणि तो तुमच्याजवळ येईल. पाप्यांनो, तुमचे हात स्वच्छ करा. आणि तुमची अंत:करणे शुद्ध करा, जे तुम्ही द्विबुद्धीचे आहात.
9 दु:खी व्हा, शोक करा, आणि रडा! तुमचे हसणे दु:खात बदलो. तुमच्या आनंदाचे खेदात रूपांतर होवो.
10 तुम्ही प्रभूसमोर नम्र व्हा म्हणजे तो तुम्हांला उच्च स्थान देईल.
11 बंधूंनो, एकमेकांविरुद्ध वाईट बोलण्याचे थांबवा, जो त्याच्या भावाविरुद्ध बोलतो किंवा जो त्याच्या भावाचा न्याय करतो तो नियमशास्त्राविरुद्ध बोलतो. आणि तो नियमशास्त्राचा न्याय करतो. आणि जर तुम्ही नियम शास्त्राचा न्याय करता तर तुम्ही नियमशास्त्र जे सांगते ते करीत नाही व तुम्ही न्यायाधीश आहात.
12 नियामशास्त्र देणारा न्यायाधीश फक्त एकच आहे. फक्त देवच तारण करण्यास व नाश करण्यास समर्थ आहे. तू जो तुझ्या शेजाऱ्याचा न्याय करतोस तो तू स्वत:ला कोण समजतोस?
13 ऐक, तू म्हणतोस, “आज किंवा उद्या आपण या शहरी किंवा त्या शहरी जाऊ व तेथे आपण एक वर्ष घालवू आणि आपण तेथे व्यापार करू व पैसा कमवू.”
14 तुला हे देखील माहीत नाही की, उद्या तुझे काय होईल. अखेर तुझे जीवन तरी काय आहे? कारण थोड्या काळपर्यंत दिसणारे आणि मग अदृष्य होणारे असे धुके तुम्ही आहात.
15 त्याऐवजी, तुम्ही नेहमी असे म्हणा, “जर प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू आणि आपण हे किंवा ते करू.”
16 पण तुम्ही तर घमेंड बाळगता आणि बढाई मारता आणि अशी बढाई मारणे वाईट आहे.
17 म्हणून जर तुम्हांला चांगले कसे करायचे हे माहीत असूनही जर ते तुम्ही करीत नाही, तर तुम्ही पाप करता.