इब्री लोकांस

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13


धडा 13

ख्रिस्तामध्ये एकमेकांवर अखंडपणे बंधु व भगिनीसारखी प्रीति करा.
2 पाहुणचार करण्याचे विसरू नका. असे करण्याने काहींनी त्यांच्या नकळत देवदूतांचे स्वागत केले आहे.
3 तुम्ही स्वत: त्यांच्याबरोबर तुरुंगात होता असे समजून जे तुरुंगात आहेत त्यांची आठवण करा. तुम्हीही देहात असल्याने जे दु:ख भोगीत आहेत त्यांची आठवण ठेवा.
4 सर्वांनी लग्नाचा आदर करावा. व वैवाहिक अशुद्धता असू नये. कारण जे व्यभिचारी व विषयवासनेबद्दल भ्रष्ट आहेत अशा लोकांचा देव न्याय करील.
5 आपले जीवन पैशाच्या लोभापासून दूर ठेवा व तुमच्याकडे जे आहे त्यातच समाधान माना. कारण देवाने असे म्हटले आहे.“मी कधीही तुला सोडणार नाही, मी कधीही तुला त्यागणार नाही” अनुवाद 31:6
6 म्हणून आपण खात्रीने म्हणू शकतो“देव माझा साहायकर्ता आहे, मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार?” स्तोत्र. 118:6
7 ज्यांनी तुम्हांला देवाचा संदेश दिला त्या पुढाऱ्यांची आठवण ठेवा. त्यांच्या जीवनातील निष्पत्ती पाहा. आणि त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा.
8 येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुगे सारखाच आहे.
9 निरनिराळ्या तऱ्हेच्या विचित्र शिकवणुकींमुळे बहकून जाऊ नका. अन्राच्या विधीने नव्हे, तर देवाच्या कृपेने आपली ह्रदये बळकट केलेली फार बरी. कारण अन्राच्या विधींचे पालन करण्याने कोणाचेही हित झालेले नाही.
10 ज्या वेदीवरील अन्र खाण्याचा किंवा सहभागी होण्याचा अधिकार मंडपात सेवा करणाऱ्यांनाही नाही. अशी वेदी आपल्याकडे आहे.
11 यहूदी मुख्य याजक प्राण्यांचे रक्त परमपवित्रस्थानात पापाचे अर्पण म्हणून घेऊन जातात. परंतु केवळ प्राण्यांची शरीरे छावणीच्या बाहेर नेऊन जाळतात.
12 म्हणून येशूने सुद्धा स्वत:च्या रक्ताने लोकांना शुद्ध करावे यासाठी नगराच्या वेशी बाहेर दु:ख सोसले,
13 म्हणून आपण छावणीच्या बाहेर जाऊ आणि येशूच्या अपमानाचे वाटेकरी होऊ.
14 कारण कायमस्वरूपी असे नगर आपल्याला येथे नसले तरी भविष्याकाळात येणारे जे नगर आहे त्याच्याकडे आपण पाहत आहोत.
15 तर मग आपण येशूच्या द्वारे स्तुतीचा यज्ञ सातत्याने करू या. म्हणजे त्याचे नाव आपल्या ओठांनी सतत घेऊ या
16 आणि इतरांसाठी चांगले ते करण्यास आणि दानधर्म करण्यास विसरू नका. कारण अशा अर्पणाने देवाला संतोष होतो.
17 आपल्या पुढाऱ्यांच्या आज्ञा पाळा आणि त्यांच्या अधीन असा. ज्यांना हिशेब द्यावयाचा असतो त्यांच्याप्रमाणे तुमच्या जीवासंबंधाने ते जागरूक असतात, त्यांच्या आज्ञा पाळा यासाठी की, त्यांनी त्यांचे काम दु:खाने न करता आनंदाने करावे.
18 आमच्यासाठी प्रार्थना करा. आमची सदसदविवेक बुध्दि शुद्ध आहे याविषयी आमची खात्री आहे आणि सर्व बाबतीत जे नेहमी बरोबर आहे तेच सदैव करीत राहावे अशी आमची इच्छा आहे.
19 मी तुम्हांला विनति करतो की, देवाने मला लवकरच तुमच्याकडे परत पाठवावे म्हणून प्रार्थना करा.
20 ज्या शांतीच्या देवाने आपल्या मेंढरांचा (म्हणजे आपल्या लोकांचा) मेंढपाळ, आपला प्रभु येशू ख्रिस्त याला रक्ताच्या युगानुयुगाच्या नव्या कराराद्धारे उठविले.
21 त्याची इच्छा पूर्ण करायला तुम्हांला चांगल्या गोष्टींनी सिद्ध करो आणि येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्याला संतोष देणारे काम आपल्यामध्ये करो. त्याला युगानुयुगे गौरव असो. आमेन.
22 बंधुजनहो, हा जो बोधपर संदेश मी थोडक्यात लिहिला आहे, तो धीर धरून ऐका अशी विनति तुम्हांला करतो.
23 आपला बंधु तीमथ्य हा तुरुंगातून सुटला आहे. जर तो लवकर माझ्याकडे आला, तर जेव्हा मी तुम्हाला भेटायला येईन तेव्हा तो मजकडे येईल.
24 तुमच्या सर्व पुढाऱ्यांना व देवाच्या सर्व संतांना सलाम सांगा, इटली येथील सर्वजण तुम्हांला सलाम सांगतात.
25 देवाची कृपा तुम्हां सर्वांबरोबर असो. आमेन.