योहान

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21


धडा 11

लाजर नावाचा एक मनुष्य आजारी होता. तो बेथानी गावात राहत होता. याच गावात मार्था आणि मरीया राहत होत्या.
2 ज्या मरीयेने प्रभूला सुगंधी तेल लावले व त्याचे पाय आपल्या केसांनी पुसले तिचा हा भाऊ होता.
3 त्या बहिणींनी येशूला निरोप पाठविला की, हे प्रभु ज्याच्यावर तू प्रीति करतोस तो आजारी आहे.
4 पण येशूने हे ऐकून म्हटले, “हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवासाठी आहे. याद्वारे देवाचे गौरव व्हावे यासाठी हा आजार आहे.”
5 येशू मार्था, मरीया व लाजर यांच्यावर प्रीति करीत असे.
6 म्हणून तो आजारी आहे हे ऐकल्यावरही तो होता त्याच ठिकाणी दोन दिवस राहिला.
7 नंतर त्याने शिष्यांना म्हटले, “आपण यहूदीयात परत जाऊ.”
8 शिष्य त्याला म्हणाले, “गुरुजी, यहूदी आपणांस दगडमार करु पाहत होते आणि आपण पुन्हा तेथे जात आहात काय?”
9 येशूने उत्तर दिले, “दिवसाचे बारा तास असतात की नाहीत? जर एखादा दिवसा चालतो, तर त्याला ठेच लागत नाही. कारण तो या जगाचा प्रकाश पाहतो.
10 पण जर कोणी रात्री चालतो, तर त्याला ठेच लागते कारण त्याच्याकडे प्रकाश नसतो.”
11 या गोष्टी बोलल्यानंतर तो त्यांना म्हणाला, “आपला मित्र लाजर झोपी गेला आहे. पण मी त्याला झोपेतून जागे करावे तरीही जात आहे.”
12 तेव्हा त्याचे शिष्य म्हणाले, “प्रभु, तो झोपी गेला असेल तर बरा होईल.”
13 पण येशू खरे तर त्याच्या मरणाविषयी बोलला होता. पण तो त्याच्या नेहमीच्या झोपेविषयी बोलत आहे, असे त्यांना वाटले.
14 तेव्हा येशूने त्यांना स्पष्ट सांगितले, “लाजर मेला आहे.
15 आणि मी तेथे नव्हतो म्हणून मला तुमच्यामुळे आनंद वाटतो. यासाठी की तुम्ही विश्वास धरावा. आपण त्याच्याकडे जाऊ या.”
16 तेव्हा दिदुम म्हटलेला थोमा शिष्यांना म्हणाला, “आपणही त्याच्याबरोबर जाऊ या अशासाठी की आपणही त्याच्याबरोबर मरु.”
17 येशू आल्यावर त्याला समजले की, लाजराला चार दिवसांपूर्वीच कबरेत ठेवण्यात आले आहे.
18 बेथानी यरुशलेमापासून तीन किलोमीटर अंतरापेक्षा कमी होते.
19 आणि पुष्कळसे यहुदी मार्था, मरीयेकडे त्यांचा भाऊ मेला याबद्दल सांत्वन करण्यासठी आले होते.
20 जेव्हा मार्थाने ऐकले की, आपल्या घरी येशू येत आहे तेव्हा ती त्याला भेटायला बाहेर गेली, पण मरीया घरातच राहिली.
21 ‘प्रभु’ मार्था येशूला म्हणाली, “तू जर येथे असतास तर माझा भाऊ मेला नसता,
22 पण मला माहीत आहे की, तू जे मागशील ते देव तुला देईल.”
23 येशू म्हणाला, “तुझा भाऊ पुन्हा उठेल.”
24 मार्था म्हणाली. “मला माहीत आहे शेवटच्या दिवशी पुनरुत्थानाच्या वेळेस तो पुन्हा उठेल.”
25 येशू तिला म्हणाला, “मी पुनरुत्थान आणि जीवन आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असेल तरी जगेल.
26 आणि जो कोणी जगतो आणि माझ्यावर विश्वास ठेवतो. तो कधीच मरणार नाही. तू यावर विश्वास ठेवतेस काय?”
27 ‘होय प्रभु.’ ती त्याला म्हणाली, “तू ख्रिस्त आहेस असा मी विश्वास धरते. तू या जगात आलेला आहे देवाचा पुत्र आहेस.”
28 आणि असे म्हटल्यानंतर ती परत गेली आणि आपली बहीण मरीया हिला एका बाजूला बोलाविले आणि म्हणाली, “गुरुजी येथे आहेत. आणि ते तुला विचारीत आहेत.”
29 जेव्हा मरीयेने हे ऐकले तेव्हा ती लगेच उठली आणि त्याच्याकडे गेली.
30 आता तोपर्थंत येशू त्या खेड्याच्या आत आला नव्हता. तर मार्था त्याला भेटली, तेथेच अजूनपर्थंत होता.
31 तेव्हा जे यहूदी तिच्या घरात तिचे सांत्वन करीत होते ते, मरीया लगबगीने उठून बाहेर गेली असे पाहून ती कबरेकडे शोक करायला गेली असे समजून तिच्यामागे गेले.
32 मग जेथे येशू होता तेथे मरीया आल्यावर ती त्याला पाहून त्याच्या पाया पडली व त्याला म्हणाली, “प्रभु, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता.”
33 मग येशू तिला रडताना पाहून व तिच्याबरोबर असलेल्या यहूद्यांनाही रडताना पाहून आत्म्यात व्याकुळ झाला व हेलावून गेला.
34 तो म्हणाला, “तुम्ही त्याला कोठे ठेवले आहे?” ते म्हणाले, “प्रभु, या आणि पाहा.”
35 येशू रडला.
36 तेव्हा यहूदी म्हणाले, “पहा! त्याला तो किती आवडत होता.”
37 पण त्यांच्यातील कित्येक म्हणाले, “ज्याने आंधळ्याचे डोळे उघडले, त्या या मनुष्याला लाजराला मरणापासून वाचविता येऊ नये काय?”
38 मग येशू पुन्हा अंत:करणात विव्हळ झाला असता कबरेकडे आला. ती गुहा होती, आणि तिच्यावर दगड लोटला होता.
39 येशूने म्हटले, “हा दगड काढा.” मार्था म्हणाली, “पण प्रभु, लाजर मरुन चार दिवस झाले आहेत, त्याला आता दुर्गंधी येत असेल.” ती मृत लाजराची बहीण होती.
40 येशूने तिला म्हटले, “जर तू विश्वास धरशील तर देवाचे गौरव पाहशील, असे मी तुला सांगितले नव्हते काय?”
41 मग त्यांनी दगड बाजूला केला. तेव्हा येशू वर पाहून म्हणाला, “पित्या, तू माझे ऐकले, म्हणून मी तुझे उपकार मानतो.
42 आणि तू नेहमीच माझे ऐकतोस हे मला माहीत आहे, पण जो लोकसमुदाय आजूबाजूला उभा आहे त्यांच्यासाठी मी हे बोललो. यासाठी की तू मला पाठविले आहेस यावर त्यांनी विश्वास ठवावा.”
43 असे बोलल्यावर त्याने मोठ्याने हाक मारली, “लजरा, बाहेर ये.”
44 मग जो मेला होता तो लाजर जिवंत होऊन बाहेर आला. त्याचे हात पाय वस्त्रांनी बांधले होते व तोंड रुमालाने झाकले होते. येशू लोकांना म्हणाला. “त्याला मोकळे करा आणि जाऊ द्या.”
45 जे यहूदी मरीयेकडे आले होते, त्यांनी येशूने जे केले ते पाहिले आणि त्यांच्यापैकी पुष्कळांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.
46 पण त्यांच्यातील काहींनी परुश्यांकडे जाऊन येशूने जे केले होते ते त्यांना सांगितल.
47 तेव्हा मुख्य याजकांनी व परुश्यांनी सभा भरवून म्हटले, हा मनुष्य पुष्कळ चमत्कार करीत आहे.
48 आम्ही त्याला असेच राहू दिले तर सर्व लोक त्याच्यार विश्वास ठेवतील आणि रोमी येऊन आमचे मंदिर व राष्ट्र दोन्हीही घेतील.”
49 तेव्हा त्यांच्यातील कयफा नावाचो व्यक्ति त्या वर्षी प्रमुख याजक होती. तो त्यांना म्हणाला, “तुम्हांला काहीच माहिती नाही!
50 तुम्ही हे लक्षात घेत नाही की, सर्व लोकांसाठी एका माणसाने मरणे हे सर्व राष्ट्राचा नाश होण्यापेक्षा हिताचे आहे.”
51 तो हे स्वत: होऊन बोलला नाही तर त्यावर्षी तो प्रमुख याजक होता म्हणून त्याने संदेश दिला की, येशू त्या राष्ट्राकरिता मरणार आहे.
52 केवळ त्या राष्ट्रासाठी असे नाही, तर यासाठी की, त्याने देवाच्या पांगलेल्यांना एकत्र करावे, म्हणून तो मरणार आहे.
53 म्हणून त्या दिवसापासून त्यांनी त्याला जिवे मारण्याची मसलत केली.
54 यामुळे येशू तेव्हापासून उघडपणे यहूघांमध्ये फिरला नाही. त्याऐवजी तो रानाजवळच्या प्रदेशातील ऐफ्राईम नावाच्या नगरात गेला व तेथे शिष्यांसह राहिला.
55 तेव्हा यहूघांचा वल्हांडण सण जवळ आला होता आणि सणाअगोदर पुष्कळ लोक आपणांस शुद्ध करायला देशातून वर यरुशलेमेस गेले.
56 ते येशूचा शोध करीत राहीले, आणि मंदिरात उभे असताना एकमेकास म्हणाले, “तुम्हाला काय वाटते? तो सणाला येणार नाही काय?’
57 पण मुख्य याजक व परुश्यांनी अशी आज्ञा केली होती की, येशू कोठे आहे हे ज्याला कळेल त्याने त्यांना कळवावे, म्हणजे ते त्याला पकडू शकतील.