आमोस

1 2 3 4 5 6 7 8 9


धडा 4

शोमरोनच्या पर्वतावर राहणाऱ्या, बाशानच्या गायींनो, मी काय म्हणतो ते ऐका! तुम्ही गरिबांना दुखविता! त्यांना चिरडून टाकत! तुम्ही तुमच्या नवऱ्यांना तुमच्यासाठी “मद्य आणण्यास सांगता!”
2 परमेश्वराने, माझ्या प्रभूने शपथ घेतली आहे. त्याने त्याच्या पवित्र्याची शपथ घेऊन सांगितले की तुमच्यावर संकटे येतील. माशांचा गळ टाकून ते तुमच्या मुलांना नेतील.
3 तुमच्या नगरीचा नाश होईल. तुमच्यातील प्रत्येकीला तटाच्या भगदाडातून बाहेर पडावे लागेल तुम्ही तुमच्या मृत बाळांना ढिगांत फेकाल. परमेश्वर असे म्हणतो.
4 “बेथेलला जा आणि पाप करा गिल्गाललाजाऊन आणखी पापे करा. सकाळी यज्ञ करा. तीन दिवसाच्या सुट्टीसाठी आपल्या पिकाचा दहावा भाग आणा.
5 खमिराची आभार-अर्पणे द्या. अनिर्बंध इच्छा अर्पणांबद्दल प्रत्येकाला सांगा. इस्राएल, तुला ह्या गोष्टी करायला आवडते. मग जा आणि हे सर्वकर!” परमेश्वर असे म्हणतो.
6 “तुम्ही माझ्याकडे यावे म्हणून मी खूप प्रयत्न केले. मी तुम्हाला अन्न दिले नाही. तुमच्या कोणत्याही गावात अन्न नव्हते. पण तुम्ही माझ्याकडे परत आला नाहीत.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.
7 “कापणीच्या हंगामाच्या तीन महिने आधीच मी पाऊस थांबविला. म्हणून पीक वाढलेच नाही मग मी एका गावात पाऊस पडू दिला पण दुसऱ्या भागातील जमीन अतिशय कोरडी झाली.
8 म्हणून दोन-तीन गावांतील लोक दुसऱ्या एका गावाकडे पाण्यासाठी धडपडत गेले. पण प्रत्येकाला पुरेल एवढे पाणीच नव्हते. पण तरीसुध्दा मदत मागायला तुम्ही माझ्याकडे आला नाहीत.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.
9 “उष्णता व रोग ह्यांनी मी तुमची पिके मारली. मी तुमच्या बागांचा व द्राक्षमळ्यांचा नाश केला. टोळांनी तुमची अंजिराची व जैतुनाची झाडे फस्त केली. पण तरीही तुम्ही मदतीसाठी माझ्याकडे आला नाहीत.” परमेश्वर ह्या गोष्टी बोलला.
10 मिसरला मी पाठविली होती, तशीच रोगराई मी तुमच्यावर पाठविली. तुमच्यावर पाठविली. तुमच्या तरुणांना मी तलवारीने मारले. मी तुमचे घोडे काढून घेतले. मी तुमच्या तळांवर प्रेतांची दुर्गंधी पसरविली. पण तरीसुध्दा मदत मागायला तुम्ही माझ्याकडे आला नाहीत.” परमेश्वर हे सर्व बोलला आहे.
11 “सदोम आणि गमोरा यांचा मी जसा नाश केला. तसाच मी तुमचा नाश केला; आगीत ओढून काढलेल्या जळक्या काटकीप्रमाणे तुमची स्थिती होती. पण तरीही तुम्ही मदत मागायला माझ्याकडे आला नाहीत.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.
12 “म्हणून, इस्राएल, मी तुझ्याबाबत पुढील गोष्टी करीन. मी तुझ्याशी असेच वागेन. इस्राएल, तुझ्या परमेश्वराला भेटण्यास सज्ज हो!
13 मी कोण आहे? पर्वत निर्माण करणारा मीच तो एकमेव! मी तुमच्या मनाची निर्मिती केली. मीच लोकांना कसे बोलायचे ते शिकविले. मीच पहाटेचे अंधारात परिवर्तन करतो. मी पृथ्वीवरील पर्वत माझ्या पायाखाली तुडवतो मी कोण आहे? माझे नाव याव्हे मी सैन्याचा परमेश्वर आहे.”