होशेय
धडा 12
एफ्राईम त्याचा वेळ वाया घालवीत आहे-इस्राएल दिवसभर “वाऱ्याचा पाठलाग करतो.” लोक अधिकाधिक खोटे बोलतात. ते जास्तीतजास्त चोव्या करतात. त्यांनी अश्शूरशी करार केले आहेत. आणि ते जैतून तेल मिसरला नेत आहेत.
2 परमेश्वर म्हणतो, “माझे इस्राएलशी भांडण आहे. याकोबला त्याच्या कर्मांबद्दल सजा मिळालीच पाहिजे. त्याने केलेल्या वाईट कृत्यांबद्दल त्याला शिक्षा झालीच पाहिजे.
3 याकोबने आईच्या गर्भात असल्यापासूनच त्याच्या भावाला फसवायला सुरवात केली. याकोब शक्तिशाली तरुण होता. त्या वेळी तो परमेश्वराविरुध्द लढला.
4 याकोबने देवदूताशी मल्लयुध्द खेळले आणि तो जिंकला तो रडला व त्याने कृपा करण्याची याचना केली. हे बेथेलमध्ये घडले. तेथे तो आमच्याशी बोलला.
5 हो, खरेच, यहोवा सैन्यांचा परमेश्वर आहे. त्याचे नाव यहोवा (परमेश्वर)असे आहे.
6 म्हणून आपल्या परमेश्वराकडे परत या त्याच्याशी निष्ठा ठेवा. योग्य तेज करा. तुमच्या परमेश्वरावर नेहमी विश्वास ठेवा.
7 “याकोब, हा खरा व्यापारी आहे. तो त्याच्या मित्रांनासुध्दा फकवितो त्याचे तराजू सुध्दा खोटे आहेत.
8 एफ्राईम म्हणाला, ‘मी श्रीमंत आहे. मला खरी संपत्ती सापडली आहे. माझे अपराध कोणालाही कळणार नाहीत. कोणालाही माझी पापे समजणार नाहीत.’
9 पण तुम्ही मिसरमध्ये असल्यापासून, मी परमेश्वर तुमचा परमेश्वर आहे. सभामंडपाच्या वेळेप्रमाणे तुम्हाला तंबूत राहायला भाग पाडीन.
10 मी संदेष्ट्यांशी बोललो मी त्यांना पुष्कळ दृष्टांन्त दिले. माझी शिकवण तुम्हाला शिकविण्यासाठी मी त्याना अनेक मार्ग दाखविले.
11 पण गिलादाच्या लोकांनी पाप केले आहे. तेथे पुष्कळ भयानक मूर्ता आहेत. गिल्गालमध्ये लोक बैलांना बळी अर्पण करतात. त्यांच्या अनेक वेदी आहेत. नांगरलेल्या शेतात ज्याप्रमाणे ढेकळांच्या रांगा असतात, त्याप्रमाणे त्यांच्या वेदींच्या रंगाच्या रांगा आहेत.
12 “याकोब अरामला पळून गेला. त्या जागी, इस्राएलने पत्नीसाठी सेवा केली. दुसरी पत्नी मिळावी म्हणून त्याने मेंढ्या पाळल्या.
13 पण परमेश्वराने संदेष्ट्यांच्या उपयोग करून देवाने इस्राएलला सुरक्षित ठेवले.
14 पण एफ्राईम परमेश्वराच्या रागास कारणीभूत झाला एफ्राईमने अनेक लोकांना ठार केले. म्हणून त्याला त्याच्या अपराधांबद्दल शिक्षा होईल. त्याचा प्रभू (परमेश्वर) त्याला अपमान सहन करायला लावील.”