स्तोत्रसंहिता
धडा 55
देवा, माझी प्रार्थना ऐक कृपा करुन माझी दयेची प्रार्थना टाळू नकोस.
2 देवा, कृपा करुन माझे ऐक आणि मला उत्तर दे मला माझ्या तक्रारी सांगू दे.
3 माझे शत्रू माझ्याविरुध्द वाईट बोलले, तो दुष्ट माणूस माझ्यावर ओरडला. माझे शत्रू रागात होते आणि त्यांनी माझ्यावर हल्ला केला. त्यांनी माझ्यावर संकटाचा पाऊस पाडला.
4 माझे ह्दय धडधडत आहे मी खूप घाबरलो आहे.
5 मी भीतीने थरथर कापत आहे. मी भयभीत झालो आहे.
6 मला कबूतरासारखे पंख असते तर किती बरे झाले असते. मी उडून विश्रांतीसाठी एखादी जागा शोधली असती.
7 मी खूप दूर वाळवंटात गेलो असतो.
8 मी पळूत जाईन मी माझी सुटका करेन. मी संकटांच्या वादळापासून दूर पळून जाईन.
9 प्रभु त्यांचा खोटेपणा बंद कर. या शहरात मला खूप हिंसा आणि भांडणे दिसत आहेत.
10 माझ्या भोवती संकटे आहेत. दिवस रात्र आणि शहराच्या सर्व भागात संकटे आहेत या शहरात महाभयंकर घटना घडत आहेत.
11 रस्त्यावर बरेच गुन्हे घडत आहेत. लोक सर्वत्र खोटे बोलत आहेत आणि फसवणूक करत आहेत.
12 जर शत्रूंनीच माझा अपमान केला तर मी तो सहन करु शकेन. जर शत्रूंनीच माझ्यावर हल्ला केला तर मी लपू शकेन.
13 परंतु मला संकटात टाकणारा तू आहेस माझा मित्र, माझा साथी, माझा दोस्त.
14 आपण आपली गुपिंतं एकमेकांना सांगितली आपण देवाच्या मंदिरात बरोबर प्रार्थना केली.
15 माझे शत्रू त्यांची वेळ यायच्या आधीच मरावेत अशी माझी इच्छा आहे, जिवंतपणीच त्यांचे दफन व्हावे असे मला वाटते. का? कारण ते त्यांच्या घरात भयंकर गोष्टी करण्याच्या योजना आखतात.
16 मी देवाला मदतीसाठी हाक मारीन आणि परमेश्वर माझे रक्षण करील.
17 मी देवाशी सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी बोलतो. मी देवाला माझ्या तक्रारी सांगतो आणि तो त्या नीट ऐकतो.
18 मी पुष्कळ लढाया लढलो आहे. पण देवाने मला नेहमीच सोडविले व सुखरुप परत आणले.
19 देव माझ्या बोलण्याकडे लक्ष देतो. तो अनादि अनंत काळचा राजा मला मदत करेल.
20 माझे शत्रू त्यांचे जीवन बदलणार नाहीत. ते देवाला घाबरत नाहीत. आणि त्याला मान ही देत नाहीत.
21 माझे शत्रू त्यांच्या मित्रांवर हल्ले करतात. ज्या गोष्टी करण्याचे त्यांनी कबूल केलेले असते त्या ते करत नाहीत.
22 माझे शत्रू गोड बोलण्यात पटाईत आहेत. ते शांतीविषयी बोलतात आणि प्रत्यक्षात मात्र युध्दाच्या योजना आखतात. त्यांचे शब्द लोण्यासारखे मऊ असतात परंतु ते सुरीसारखे कापतात.
23 तू तुझ्या चिंता परमेश्वराकडे सोपव आणि तो तुझी काळजी घेईल. परमेश्वर चांगल्या लोकांचा कधीही पराभव होऊ देणार नाही.
[24] देवा, त्या खोटारड्या आणि खुनी माणसांना त्यांचे आयुष्य अर्धे राहिलेले असतानाच त्यांच्या थडग्यात पाठव आणि माझे म्हणशील तर, माझा तुझ्यावर भरंवसा आहे.