2 इतिहास

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36


धडा 25

अमस्या राजा झाला तेव्हा पंचवीस वर्षांचा होता. नंतर त्याने यरुशलेममध्ये एकोणतीस वर्षे राज्य केले. याच्या आईचे नाव यहोअदान. ती यरुशलेमची होती.
2 त्याची वर्तणूक परमेश्वराला पटेल अशी होती पण त्यात मन:पूर्वकता नव्हती.
3 अमस्या शक्तिशाली राजा झाला मग त्याने आपल्या वडलांच्या मारेकऱ्यांची हत्या केली.
4 पण त्याच्या मुलांना त्याने ठार केले नाही कारण याबाबतीत मोशेच्या नियमशास्त्रातली आज्ञा त्याने पाळली. परमेश्वराची आज्ञा अशी आहे, “मुलांच्या अपराधासाठी आईवडलांना आणि आईवडलांच्या अपराधासाठी मुलांना मृत्युदंड देऊ नये. ज्याच्या हातून अपराध झाला त्या व्यक्तीलाच देहदंड व्हावा.”
5 अमस्याने सर्व यहूदा लोकांना एकत्र केले आणि त्यांच्या घराण्यांवर सेनापती आणि सेनानायक यांच्या नेमणुका केल्या. समस्त यहूदा आणि बन्यामिन सैनिकांवर या प्रमुखांचा अंमल होता. युध्दात भाग घेण्यासाठी वय वर्षे किमान वीस आणि त्यापुढील वयाचे सैनिक निवडले. भाले आणि ढाली या आयुधांनी सज्ज असे सैनिक त्याने मोजले. ते एकंदर 3,00,000 निवडक सैनिक युध्दाला तयार होते.
6 यांच्याखोरीज आणखी 1 लक्ष सैन्याची कुमक अमस्याने इस्राएलकडून मागवली. त्यासाठी त्याने 33/4टन चांदी एवढी किंमत मोजली.
7 पण यावेळी देवाचा एक माणूस अमस्याकडे येऊन त्याला म्हणाला, “हे राजा, इस्राएलच्या सैन्याला आपल्याबरोबर घेऊ नकोस. एफ्राइमच्या वंशजांना म्हणजेच इस्राएलच्या लोकांना परमेश्वराची साथ नाही.
8 तू भले कितीही तयारी करुन लढाईत उतरलास तरी तुझा जय पराजय होणे देवाच्याच हातात आहे.”
9 यावर अमस्या त्या देवाच्या माणसाला म्हणाला, “पण इस्राएली सैन्याला मी पैसे देऊन बसलो आहे, त्याचे काय?” देवाचा माणूस म्हणाला, “परमेश्वराकडे अलोट संपत्ती आहे, तो तुला त्यापेक्षा कितीतरी जास्त देऊ शकेल.”
10 तेव्हा अमस्याने इस्राएलच्या सैन्याला एफ्राइमला परत पाठवले. या कृत्यामुळे इस्राएली सैन्य, यहुदाचा राजा आणि यहूदाचे लोक यांच्यावर संतापले आणि रागानेच घरी परतले.
11 यानंतर अमस्याने मोठेच धाडस करुन अदोम देशातील मिठाच्या खोऱ्यावर हल्ला चढवला. अमस्याच्या सैन्याने या ठिकाणी सेइर मधील 10,000 लोकांना ठार केले.
12 आणखी 10,000 जणांना बंदिवान केले. त्यांना धरुन खडकाच्या माध्यावर नेले आणि एवढ्या उंचीवरुन त्यांचा कडेलोट केला. खालच्या दगडधोंड्यांवर त्यांचे देह छिन्नविच्छिन्न होऊन पडले.
13 नेमक्या याचवेळी इस्राएली सैन्याने यहूदातील काही नगरांवर हल्ला चढवला. त्यांनी बेथ - होरोनपासून थेट शोमरोनपर्यंत गावे उद्ध्वस्त केली. 3000 लोकांना जिवे मारले आणि मौल्यवान चीजवस्तू लुटल्या. अमस्याने आपल्याला लढाईत सामील करुन न घेतल्यामुळे हे इस्राएली सैन्य भडकले होते.
14 अदोम्यांचा पाडाव करुन अमस्या आपल्या नगरात परतला. येताना त्याने सेइरमधील लोकांच्या देवाच्या मूर्ती बरोबर आणल्या आणि त्यांची पूजाअर्चा सुरु केली. या दैवतांना वंदन करुन तो त्यांच्यापुढे धूप जाळू लागला.
15 या कृतीमुळे परमेश्वराचा अमस्यावर कोप झाला. परमेश्वराने संदेष्ट्याला अमस्याकडे पाठवले. संदेष्टा राजाला म्हणाला, “अमस्या, त्या लोकांच्या दैवतांची पूजा तू का करत आहेस? त्या दैवतांना तर स्वत:च्याच लोकांचे तुझ्यापासून रक्षण करता आले नाही.”
16 अमस्या संदेष्ट्याच्या या बोलण्यावर म्हणाला, “आम्ही तुला राजाचा सल्लागार म्हणून नेमलेले नाही, तेव्हा तू गप्प राहावे हे चांगले नाहीतर जिवाला मुकशील.” संदेष्टा गप्प बसला पण नंतर म्हणाला, “देवाने तुझा नाश करायचे निश्चित केले आहे. कारण तू करु नये त्या गोष्टी केल्यास आणि माझे ऐकले नाहीस.”
17 यहूदाचा राजा अमस्या याने यावर आपल्या सल्लागारांबरोबर विचार विनिमय केला. मग योवाशला त्याने निरोप पाठवला की, “आपली एकदा प्रत्यक्ष गाठ पडली पाहिजे.” योवाश हा यहोआहाजचा मुलगा आणि यहोआहाज येहूचा. होहू इस्राएलचा राजा होता.
18 इस्राएलचा राजा योवाश याने यहूदाचा राजा अमस्या याच्याकडे आपले उत्तर पाठवले. योवाशने दृष्टांत दिला तो असा: “लबानोन मधल्या एका काटेरी झुडुपाने लबानोनच्याच एका गंधसरुला निरोप पाठवला की, ‘तुझ्या मुलींचे माझ्या मुलाशी लग्न व्हावे.’ पण तेवढ्यात ते झुडुप तिथून जाणाऱ्या एका वन्यपशूच्या पायाखाली तुडवले गेले.
19 ‘मी अदोमचा पारभव केला.’ असे तू खुशाल म्हण. तू हे प्रौढीने म्हणतो आहेस खरे पण तू आपल्या घरी स्वस्थ बसावेस हे बरे. उगीच नसत्या फंदात पडून अडचणीत येऊ नकोस! पण तू तसे केलेस तर तू स्वत:च्या आणि त्याबरोबर यहूदाच्या नाशाला कारणीभूत होशील.”
20 पण अमस्याने या निरोपाला दाद दिली नाही. देवाच्याच मनात तसे होते. यहूदाच्या लोकांनी अदोमी लोकांच्या दैवताचे भजनपूजन सुरु केल्यामुळे इस्राएलकडून यहूदाचा पराभव करायचे परमेश्वराने योजले होते.
21 तेव्हा इस्राएलचा राजा योवाश आणि यहूदाचा राजा अमस्या यांची बेथ - शेमेश नगरात समोरासमोर गाठ पडली. बेथ - शेमेश यहूदातच आहे.
22 इस्राएलने यहूदाचा पराभव केला. झाडून सर्व यहूद्यांनी या लढाईतून पळ काढला.
23 योवाशने बेथ - शेमेश येथे अमस्याला पकडले आणि यरुशलेमला नेले. अमस्याच्या वडलांचे नाव योवाश. योवाशचे वडील यहोआहाज. योवाशने एफ्राइम वेशीपासून कोपऱ्याच्या वेशीपर्यंतची यरुशलेमच्या तटबंदीची 600 हात लांबीची भिंत पार मोडून तोडून टाकली.
24 सर्व सोनेरुपे तसेच मंदिरातील उपकरणी, भांडी देखील त्याने हस्तगत केली. देवाच्या मंदिरातील वस्तूंची देखभाल करण्याची जबाबदारी ओबेअदोमची होती. राजमहालातील चीजवस्तूही योवाशने लुटली. काही जणांना बंदिवान केले. या सगळ्यासह तो शोमरोनला परतला.
25 योवाशच्या मृत्यूनंतर अमस्या पंधरा वर्षे जगला. अमस्याचे वडील म्हणजे यहुदाचा राजा योवाश.
26 यहूदा आणि इस्राएलमधील राजांचा इतिहास या पुस्तकात, अमस्याने बाकी जे जे केले त्याची साद्यंत हकीकत आली आहे.
27 अमस्याने परमेश्वराचे आज्ञापालन करायचे थांबवल्यावर यरुशलेमच्या लोकांनी त्याच्याविरुध्द कट केला. तेव्हा तो लाखीश येथे पळून गेला. पण लोकांनी त्याच्या मागावर माणसे पाठवून त्याचा तेथे वध केला.
28 अमस्याचा मृत देह मग लोकांनी घोड्यावर लादला आणि यहूदानगरात आणून त्याला पूर्वजांशेजारी पुरले.