1 इतिहास

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29


धडा 15

दावीदाने दावीदानगरात स्वत:साठी घरे बांधली. तसेच करारकोश ठेवण्यासाठी एक स्थान उभारले. ते एका तंबूसारखे होते.
2 मग दावीद म्हणाला, “फक्त लेवींनाच करारकोश वाहून आणण्याची परवानगी आहे. या कामासाठी आणि सर्वकाल परमेश्वराची सेवा करण्यासाठीच लेवींची निवड झाली आहे.”
3 या जागेपाशी करारकोश आणायला म्हणून दावीदाने यरुशलेममधील सर्व इस्राएल लोकांना एकत्र बोलावले.
4 अहरोनाचे वंशज आणि लेवी यांनाही यायला सांगितले.
5 कहाथच्या घराण्यातील 120 माणसे होती. उरीयेल त्यांचा प्रमुख होता.
6 मरारीच्या कुळातले. 220 जण होते. असाया हा त्यांचा नेता होता.
7 गर्षोमच्या घराण्यातली 130 लोक असून, योएल हा त्यांचा प्रमुख होता.
8 अलीसाफानच्या घराण्यापैकी 200 लोक होते. त्यांचा नेता शमाया होता.
9 हेब्रोनच्या वंशातले 80 लोक होते. अलीएल त्यांच्या नेता होता.
10 उज्जियेलच्या घराण्यातले 112जण असून अमीनादाब हा प्रमुख होता.
11 दावीदाने मग सादोक आणि अब्याथार याजकांना बोलावले. तसेच उरीयेल, असाया, योएल, शमाया, अलीएल आणि अम्मीनादाब या लेवीनाही बोलावून घेतले.
12 दावीद त्यांना म्हणाला, “तुम्ही लेवी घराण्यांचे प्रमुख आहात. तुम्ही आणि सर्व लेवींनी शुचिर्भूत झाले पाहिजे. त्यानंतर मी तयार केलेल्या जागेत तुम्ही तो करारकोश आणा.
13 गेल्या वेळी हा कोश कसा आणवा याबद्दल आपण परमेश्वराला विचारले नाही. तुम्हा लेवींनी तो आणला नाही. म्हणून परमेश्वराने आपल्याला ती शिक्षा दिली.”
14 इस्राएलच्या परमेश्वर देवाचा करारकोश आणता यावा यासाठी मग सर्व याजक आणि लेवी शुचिर्भूत झाले.
15 मोशेने सांगितले होते त्याप्रमाणे करारकोश खांद्यावरुन आणण्यासाठी लेवींनी विशेष प्रकारच्या काठ्या घेतल्या. परमेश्वराने सांगितल्याप्रमाणेच त्यांनी तो करारकोश आणला.
16 दावीदाने लेवी प्रमुखांना आपल्या गायकबंधूंना बोलावून घ्यायला सांगितले. सतार, वीणा, झांजा ही वाद्ये आणून त्यांना मंगलगीते म्हणायला सांगितले.
17 लेवींनी मग हेमान आणि त्याचे भाऊ आसाफ आणि एथान यांना नेमले. हेमान हा योएलचा मुलगा. आसाफ बरेख्याचा मुलगा. एथान कुसायाचा मुलगा. हे सर्वजण मरारीच्या घराण्यातले होते.
18 याखेरीज लेवींचा आणखी एक गट होता. जखऱ्या, बेन, यजीएल, शमीरामोथ, यहीएल, उन्न, अलीयाब, बनाया, मासेमा, मत्तिथ्या, अलीफलेह, मिकनेया, ओबेद-अदोम आणि ईयेल हे ते होत. हे द्वारपाल होते.
19 हेमान, आसाफ आणि एथान यांनी पितळी झांजा वाजवल्या.
20 जखऱ्या, अजीएल, शमीरामोथ, यहीएल, उन्नी, अलीयाब, मासेया, बनाया हे उच्च स्वरात सतारी वाजवत होते.
21 मत्तिथ्या, अलीफलेह, मिकनेया, ओबेद-अदोम, ईयेल आणि अजज्या हे मंदसुरात वीणा वाजवण्याच्या कामावर होते. त्यांचे हे नेहमीचेच काम होते.
22 लेवींचा प्रमुख कनन्या हा मुख्य गायक होता. गायनात निपुण असल्यामुळे त्याच्यावर ही कामगिरी होती.
23 बरेख्या आणि एलकाना हे करार कोशाचे रक्षक होते.
24 शबन्या, योशाफाट, नथानेल, अमासय, जखऱ्या, बनाया आणि अलियेजर हे याजक करारकोशापुढे चालताना कर्णे वाजवत होते. ओबेद-अदोम आणि यहीया हे करार कोशाचे आणखी दोन रक्षक होते.
25 दावीदा, इस्राएलमधील वडीलधारी मंडळी, सरदार करार कोश ओबेद-अदोमच्या घरातून आणयया पुढे गेले. सर्वजण अत्यंत आनंदात होते.
26 करार कोश उचलून आणणाऱ्यांना देवाने साहाय्य केले. त्यांनी सात गोऱ्हे आणि सात मेंढे यांचे यज्ञार्पण केले.
27 करारकोश वाहून नेणाऱ्या सर्व लेवींनी तलम वस्त्राचे अंगरखे घातले होते. गायकप्रमुख कनन्या आणि इतर सर्व गायक यांनी तलम झगे घातले होते. दावीदाचा अंगरखा देखील तलम कापडाचा होता. शिवाय त्याने तशाच कापडाचा एफोद सुध्दा घातला होता.
28 अखेर सर्व इस्राएल लोकांनी करार कोश आणला. जयघोष करत रण-शिंगाच्या नादांत, कर्णे, झांजा, सतारी, वीणा वाजवत त्यांनी तो आणला.
29 करार कोश दावीदनगरात पोहंचला तेव्हा शौलची मुलगी मीखल हिने खिडकीतून पाहिले. दावीद राजाला नाचताना, जल्लोष करताना पाहून त्याच्याबद्दलचा तिचा आदर नाहीसा झाला. तिला त्याचा तो वेडगळपणा वाटला.