1 शमुवेल 1
धडा 2
हन्नाने परमेश्वराला धन्यवाद देणारे गीत म्हटले;“परमेश्वराबद्दल माझ्या मनात आनंद मावत नाही. त्याच्यामुळे मला सामर्थ्य आलेमाझ्या शत्रुंना मी हसते.माझ्या विजयाचा मला आनंद आहे!
2 परमेश्वरासारखा पवित्र कोणी देव नाही. देवा, तुझ्यावाचून कोणी नाही. आमच्या देवासारखा अभेद्य दुर्ग दुसरा नाही.
3 लोकहो, बढाया मारु नका. गर्वाने बोलू नका. कारण परमेश्वर सर्वज्ञ आहे. तोच लोकांचे नेतृत्व करतो आणि त्यांना न्याय देतो.
4 शूरांची धनुष्यं भंगतात आणि दुर्बळ लोक शक्तीशाली होतात.
5 पूर्वी ज्यांच्याकडे अन्नाधान्याचे मुबलक साठे होते त्यांना आज अन्नासाठी मोल मजुरी करावी लागत आहे. आणि जे पूर्वी भुकेकंगाल होते ते आता आराम करत आहेत. आजपर्यंत नि:संतान होती तिला आता सात मुलं आहेत. पण मुलबाळ असलेली दु:खी आहे. कारण तिची मुलं तिच्यापासून लांब गेली आहेत.
6 परमेश्वर लोकांना मरण देतो आणि परमेश्वरच त्यांना जीवन देतो. तोच अधोलोकाला नेतो आणि वरही आणतो.
7 परमेश्वरच काहीना दरिद्री तर काहींना श्रीमंत करतो. काही लोकांना लाचार करतो तर काहींचा सन्मान परमेश्वरच करतो.
8 गरीबांना धुळीतून उचलून त्यांचे दु:ख हरणत्यांचा गौरव करुन त्यांना राजपुत्रांच्या बरोबरीने बसवतो, मानाचे स्थान देतो. जगाची निर्मिती परमेश्वरानेच केली. सर्वजगावर त्याचीच सत्ता आहे.
9 सज्जनांना तो आधार देतो. त्यांना लटपटू देत नाही. पण दुर्जनांचा संहार करतो. त्यांना गर्तेत ढकलतो दुर्जनांचे बळ अशा वेळी कुचकामी ठरते.
10 शत्रूंचा तो नाश करुन त्याच्यावर गर्जेल. दूरदूरच्या प्रदेशांचाही तो न्याय करील. राजाला सामर्थ्य देईल. आपल्या खास राजाला बलवान करील.”
11 एलकाना आणि त्याचे कुटुंबीय रामा येथे परतले. मुलगा मात्र शिलो येथे एली याजकाच्या हाताखाली परमेश्वराच्या सेवेत राहिला.
12 एलीची मुले वाईट होती. त्यांना परमेश्वराची पर्वा नव्हती.
13 याजकांनी लोकांना जशी वागणूक द्यावी तशी ते देत नव्हते. खरी रीत अशी होती की लोकांनी यज्ञासाठी बळी आणल्यावर याजकांनी ते मांस शिजत ठेवायचे. याजकाच्या नोकराने तीन काटे असलेली आकडी आणायची.
14 तपेल्यात तो त्रिशूल खुपसून त्यावर येईल तेवढेच मांस याजकाने स्वीकारायचे. शिलो येथे यज्ञासाठी येणाऱ्या सर्व इस्राएलीच्या बाबतीत याजकांनी असेच करायला हवे होते.
15 पण एलीची मुले मात्र असे करत नसत. वेदीवर चरबीचे हवन करण्याआधीच त्यांचा नोकर लोकांजवळ येऊन म्हणे, “याजकांसाठी म्हणून थोडे मांस भाजायला द्या. शिजलेले मांस ते घेणार नाहीत.”
16 “हवान तर होऊ दे, मग हवे तेवढे त्यातून काढून घे,” असे कोणी म्हणालेच तर तो नोकर म्हणे, “नाही, आत्ताच द्या नाहीतर मी जबरदस्तीने काढून घेईन.”
17 परमेश्वराला देण्यात येणाऱ्या यज्ञबली विषयी हफनी आणि फिनेहास यांना कोणताही आदरभाव नव्हता हेच यातून दिसून येई. हे परमेश्वराविरुध्द असलेले मोठे पाप होते.
18 पण शमुवेल मात्र परमेश्वराची सेवा करत असे. एफोद घालून तो मदत करी.
19 त्याची आई दरवर्षी त्याच्यासाठी लहानसा अंगरखा शिवत असे. दरवर्षी नवऱ्याबरोबर शिलो येथे यज्ञासाठी जाताना ती तो घेऊन जाई.
20 एलकाना आणि त्याची बायको यांना एली मनापासून आशीर्वाद देई. तो म्हणे, “हन्नापासून तुला आणखी संतती होवो. परमेश्वराच्या आशीर्वादाने झालेला मुलगा तुम्ही परमेश्वराला दिलात, तेव्हा तुम्हाला आणखी मुले होवोत.”हन्ना आणि एलकाना मग घरी परतत.
21 परमेश्वराने हन्नावर कृपा केली आणि तिला नंतर तीन मुलगे आणि दोन मुली झाल्या. शमुवेल परमेश्वराच्या पवित्र सान्निध्यात वाढत होता.
22 एली आता म्हतारा होत चालला. शिलो येथे येणाऱ्या इस्राएलींशी होणारे आपल्या मुलांचे वर्तन पुन्हा पुन्हा त्याच्या कानावर येऊ लागले. दर्शन मंडपाच्या दाराशी सेवेत असलेल्या बायकांशी त्यांनी कसा अतिप्रसंग केला हेही त्याने ऐकले.
23 तेव्हा तो मुलांना म्हणाला, “तुमचे प्रताप माझ्या कानावर आले आहेत. अशी नीच कृत्ये तुम्ही का करता?
24 मुलांनो, असे करत जाऊ नका. परमेश्वराचे लोक तुमच्याविषयी फार वाईट बोलत आहेत.
25 एका माणसाने दुसऱ्या माणसाचा काही अपराध केला तर परमेश्वर एकवेळ त्याच्या मदतीला येईल. पण परमेश्वराविरुध्दच पातक केले तर त्याच्या मदतीला कोण धावून येणार?”पण एलीच्या मुलांनी वडिलांच्या सांगण्याकडे साफ दुर्लक्ष केले. तेव्हा परमेश्वराने या मुलांना मारायचे ठरवले.
26 शमुवेल मोठा होत चालला. परमेश्वर आणि लोक त्याच्यावर प्रसन्न होते.
27 एकदा परमेश्वराचा संदेष्टा एलीकडे आला आणि म्हणाला, “परमेश्वराने हा निरोप दिला आहे; ‘तुझे पूर्वज फारोच्या घराण्यात दास होते. तेव्हा मी त्यांच्या पुढे प्रगट झालो.
28 इस्राएलच्या सर्व घराण्यांमधून तुमच्याच घराण्याची मी माझे याजक होण्यासाठी म्हणून निवड केली. वेदीवर यज्ञबली अर्पण करावा, धूप जाळावा, एफोद घालावा म्हणून मी तुम्हाला निवडले. इस्राएलचे लोक यज्ञ करतात त्यातील मांस मी तुम्हाला घेऊ दिले.
29 तेव्हा तुम्ही त्या यज्ञाचा आणि देणग्यांचा आदर ठेवत नाही हे कसे? माझ्यापेक्षा तू आपल्या मुलांचाच मान ठेवतोस? इस्राएल लोक मला जे मांस वाहतात, त्यातील उत्कृष्ट भाग स्वत:साठी घेऊन तू पुष्ट झाला आहेस.’
30 “तुझे घराणेच निरंतर त्याची सेवा करील असे इस्राएलचा देव जो परमेश्वर याने म्हटले होते खरे. पण आता त्याचे म्हणणे असे आहे की, ‘इथून पुढे असे होणार नाही. माझा आदर ठेवतात त्यांचा मी मान राखीन. पण जे अनादर करतात त्यांच्यावर संकटे कोसळतील.
31 तुझ्या सर्व वंशजांचा संहार करायची वेळ येऊन ठेपली आहे. तुझ्या घराण्यातील कोणीही आता दीर्घायुषी होणार नाही..
32 इस्राएलमध्ये सर्व चांगले घडेल. पण तुझ्या घरात मात्र सगळी दुर्दशा होईल.तुझ्या घरातले कोणी म्हातारा होई पर्यत जगणार नाही.
33 माझ्या वेदीजवळ याजक म्हणून सेवा करायला फक्त एकाला मी शिल्लक ठेवीन. त्याला दीर्घायुष्य लाभेल. तो जराजर्जर होईपर्यंत जगेल. तुझे वंशज मात्र तलवारीला बळी पडतील.
34 हे सर्व खरेच घडणार आहे याची प्राचीती मी तुला दाखवीन. तुझे दोनही मुलगे हफनी आणि फिनहास, एकाच दिवशी मरतील.
35 मी एका विश्वासू याजकाची माझ्यासाठी निवड करीन. तो माझे ऐकेल आणि माझ्या मनाप्रमाणे काम करील. या याजकाच्या घराण्याला मी स्थिरस्थावर करीन. मी निवडलेल्या राजापुढे तो सेवेत राहील.
36 मग तुझ्या घरातील उरले सुरले लोक येऊन या याजकापुढे नतमस्तक होतील. किरकोळ रक्कम किंवा भाकरतुकडा याच्यासाठी ते पदर पसरतील आणि म्हणतील, “माझ्या भाकरीची सोय व्हावी म्हणून याजकपदातील एखादे काम मला द्या.”