अनुवाद

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34


धडा 11

“म्हणून तुमचा देव परमेश्वर ह्यावर प्रेम करा. त्याच्या आज्ञेप्रमाणे वागा. त्याने घालून दिलेल्या नियमांचे, आज्ञांचे पालन करा.
2 त्याने तुमच्यासाठी केलेले सर्व प्रताप आज आठवा. हे मी तुम्हांलाच सांगत आहे. तुमच्या मुलाबाळांना नव्हे. कारण त्यांनी यापैकी काहीच पाहिले, अनुभवले नाही. त्याची थोरवी, त्याचे सामर्थ्य व पराक्रम तुम्ही पाहिलेले आहे.
3 मिसरचा राजा फारो व त्याचा सर्व देश यांच्या विरुध्द त्याने कोणती कृत्ये केली हे तुम्ही पाहिलेच आहे.
4 मिसरचे सैन्य, त्यांचे घोडे, रथ यांची कशी दैना झाली, तुमचा ते पाठलाग करत असताना त्यांच्यावर तांबड्या समुद्राच्या पाण्याचा लोंढा कसा आणला हेही तुम्ही पाहिले. परमेश्वराने त्यांना पूर्ण नेस्तनाबूत केले.
5 तुम्ही येथे येईपर्यंत रानावनातून तुम्हाला त्याने कसे आणले हे तुम्हाला माहीत आहेच.
6 त्याचप्रमाणे रऊबेनाचा मुलगा अलीयाब याच्या दाथान व अबीराम या मुलांचे देवाने काय केले ते तुम्हांला माहीत आहे. त्यांना आणि त्यांचे कुटुंबिय, त्यांचे तंबू, नोकरचाकर व गायीगुरे यांना सर्व इस्राएलीदेखत पृथ्वीने आपल्या पोटात घेतले.
7 परमेश्वराची ही महान कृत्ये तुमच्या मुलांनी नाही, तर तुम्ही पाहिलीत.
8 “तेव्हा आज मी देतो ती प्रत्येक आज्ञा कटाक्षाने पाळा त्यामुळे तुम्ही बलशाली व्हाल, यार्देन ओलांडून जो देश ताब्यात घ्यायला तुम्ही सिद्ध झाला आहात तो हस्तगत कराल.
9 त्या देशात तुम्ही चिरकाल राहाल. तुमच्या पूर्वजांना व त्यांच्या वंशजांना हा प्रदेश द्यायचे परमेश्वराने वचन दिले आहे. या प्रदेशात सुबत्ता आहे.
10 तुम्ही जिथे जाणार आहात तो प्रदेश तुम्ही सोडून आलेल्या मिसरसारखा नाही. तेथे तुम्ही पेरणी झाल्यावर भाजीचा मळा शिंपावा तसे पायाने कालव्याचे पाणी ओढून देत होता.
11 पण आता मिळणारी जमीन तशी नाही. इस्राएलमध्ये डोंगर आणि खोरी आहेत. आकाशातून पडणाऱ्या पावसाचे पाणी या भूमीला मिळते.
12 तुमचा देव परमेश्वर या जमिनीची काळजी राखतो. वर्षांच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याची या जमिनीवर कृपादृष्टी असते.
13 “परमेश्वर म्हणतो, ‘ज्या आज्ञा मी आज तुम्हांला देत आहे त्यांचे तुम्ही काटेकोरपणे पालन करा. मन:पूर्वक तुमचा देव परमेश्वर याची सेवा करा. त्याच्यावर प्रेम करा.
14 तसे वागलात तर तुमच्या भूमिवर मी योग्य वेळी पाऊस पाडीन. म्हणजे तुम्हाला धान्य, नवीन द्राक्षारस, तेल यांचा साठा करता येईल.
15 माझ्यामुळे तुमच्या गुराढोरांना कुरणात गवत मिळेल. तुम्हाला खाण्याकरीता पुष्कळ असेल.’
16 “पण सांभाळा, गाफील राहू नका. या देवापासून परावृत होऊन इतर दैवतांचे भजन पूजन करु नका.
17 तसे केलेत तर परमेश्वराचा कोप होईल. तो आकाश बंद करील आणि मग पाऊस पडणार नाही. जमिनीत पीक येणार नाही. जो चांगला देश परमेश्वर तुम्हांला देत आहे त्यात तुम्हांला लौकरच मरण येईल.
18 “म्हणून सांगतो या आज्ञा लक्षात ठेवा. त्या ह्दयात साठवून ठेवा. त्या लिहून ठेवा. आणि लक्षात राहण्यासाठी हातावर बांधा व कपाळावर लावा.
19 आपल्या मुलाबाळांना हे नियम शिकवा. घरीदारी, झोपताना, झोपून उठताना त्याविषयी बोलत राहा.
20 घराच्या फाटकांवर, आणि दारांच्या खांबांवर ही वचने लिहा.
21 म्हणजे जो देश परमेश्वराने तुमच्या पूर्वजांना शपथपूर्वक देऊ केला त्या देशात तुम्ही आणि तुमची मुलेबाळे पृथ्वीवर आकाशाचे छप्पर असेपर्यंत राहाल.
22 “मी सांगतो त्या सर्व आज्ञा नीट पाळा. परमेश्वर तुमचा देव ह्याजवर प्रेम करा. त्याने सांगितलेल्या मार्गाने जा. त्याच्यावरच निष्ठा ठेवा.
23 म्हणजे तुम्ही जाल तेव्हा तेथील इतर राष्ट्रांना तो तेथून हुसकावून लावेल. तुमच्यापेक्षा मोठ्या आणि सामर्थ्यवान राष्ट्रांवर तुम्ही ताबा मिळवाल.
24 जेथे जेथे तुम्ही पाय ठेवाल ती जमीन तुमची होईल. दक्षिणेतील वाळवंटापासून उत्तरेला लबानोन पर्यंत आणि पूर्वेला फरात नदीपासून पश्चिमेला समुद्रापर्यंत एवढा प्रदेश तुमचा होईल.
25 कोणीही तुमचा सामना करु शकणार नाही. परमेश्वर देवाने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, तुम्ही जेथे जेथे जाल तेथे लोकांना तुमची दहशत वाटेल.
26 “आज मी तुमच्यापुढे आशीर्वाद आणि शाप हे पर्याय ठेवत आहे. त्यातून निवड करा.
27 आज मी तुमचा देव परमेश्वर ह्याचा ज्या आज्ञा तुम्हाला सांगितल्या त्या नीट लक्षपूर्वक पाळल्यात तर तुम्हाला आशीर्वाद मिळेल.
28 पण या आज्ञा न ऐकता भलतीकडे वळलात तर शाप मिळेल. तेव्हा आज मी सांगितल्या मार्गानेच जा. इतर दैवतांच्या मागे लागू नका. परमेश्वराला तुम्ही ओळखता पण इतर दैवतांची तुम्हाला ओळख नाही.
29 “तुमचा देव परमेश्वर तुम्हाला त्या प्रदेशात घेऊन जाईल. तुम्ही लौकरच तो प्रदेश ताब्यात घ्याल. तेथे गेल्याबरोबर तुम्ही गरिज्जीम डोंगरावर जा, व आशीर्वाद उच्चारा. मग तेथून एबाल डोंगरावर जाऊन शापवाणीचा उच्चार करा.
30 हे डोंगर यार्देन नदीच्या पलीकडे, अराबात राहाणाऱ्या कनानी लोकांच्या प्रदेशात, पश्चिमेकडे गिलगाल शहराजवळच्या मोरे येथील ओक वृक्षांजवळ आहेत.
31 तुम्ही यार्देन नदी पार करुन जाल. तुमचा देव परमेश्वर देत असलेली जमीन तुम्ही ताब्यात घ्याल. ती तुमची असेल. त्यात वस्ती कराल तेव्हा
32 मी आज सांगितलेले नियम, विधी यांचे पालन करा.