निर्गम

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40


धडा 13

मग परमेश्वर मोशेला म्हणाला,
2 “इस्राएलाचा प्रत्येक प्रथम जन्मलेला म्हणजे मातेच्या उदरातून बाहेर आलेला मुलगा, त्याच प्रमाणे पशूतला प्रथम जन्मलेला नर ह्यांना माझ्यासाठी पवित्र म्हणून वेगळे ठेव. ते माझे आहेत.”
3 मोशे लोकांना म्हणाला, “आजच्या दिवसाची आठवण ठेवा. तुम्ही मिसर देशात गुलाम म्हणून होता; परंतु ह्या दिवशी परमेश्वराने आपल्या महान सामर्थ्याने तुम्हांस गुलामगिरीतून सोडवून बाहेर आणले म्हणून तुम्ही खमीर घातलेली भाकर खाऊ नये.
4 आज अबीब महिन्यात तुम्ही मिसर सोडून निघत आहात.
5 परमेश्वराने तुमच्या पूर्वजांशी विशेष करार केला होता की कनानी, हित्ती, अमोरी, हिव्वी व यबूसी या लोकांचा देश मी तुम्हाला देईन;त्यामुळे त्या देशात नेल्यानंतर तुम्ही या दिवसाची आठवण ठेवलीच पाहिजे; तुम्ही प्रत्येक वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या ह्या दिवशी परमेश्वराची उपासना करण्यासाठी हा सण पाळला पाहिजे.
6 “या सात दिवसात तुम्ही बेखमीर भाकर खावी. सातव्या दिवशी मोठी मेजवानी करून तुम्ही हा सण पाळावा;
7 ह्या सात दिवसात तुम्ही खमीर घातलेली भाकर खाऊ नये. तुमच्या देशाच्या हद्दीत कोठे ही खमीर घातलेली भाकर नसावी.
8 ह्या दिवशी परमेश्वराने आम्हाला मिसर देशातून बाहेर आणले म्हणून आम्ही हा सण पाळीत आहोत’ असे तुम्ही आपल्या मुलाबाळांना सांगावे.
9 “हा सणाचा दिवस म्हणजे जणू काय तुम्हाला आठवण देण्याकरिता तुमच्या हाताला बांधलेल्या दोऱ्यासारखा होईल, तो तुम्हाला डोव्व्यांच्या दरम्यान चिन्ह असा होईल.त्याच्यामुळे तुम्हाला परमेश्वराच्या शिकवणुकीची आठवण होईल. तसेच परमेश्वराने आपल्या सामर्थ्याने तुम्हाला मिसरमधून बाहेर आणले याची आठवण करण्यास तो तुम्हाला मदत करील.
10 म्हणून प्रत्येक वर्षी योग्य वेळी म्हणजे ह्या सणाच्यावेळी ह्या दिवसाची तुम्ही आठवण ठेवा.
11 “परमेश्वराने तुमच्या पूर्वजांना वचन दिल्याप्रमाणे तो तुम्हाला आता कनानी लोक राहात असलेल्या देशात घेऊन जाईल व तो देश तुम्हाला देईल. तो दिल्यानंतर
12 तुम्ही परमेश्वराला तुमचा प्रथम जन्मलेला मुलगा व पशूंमधील प्रथम जन्मलेला नर देण्याची आठवण ठेवलीच पाहिजे.
13 गाढवाच्या प्रथम जन्मलेल्या शिंगराला एक कोकरू देऊन परमेश्वराकडून सोडवून घेता येईल; परंतु तुम्हाला ते शिगंरु तसे सोडवायचे नसेल तर त्याचा वध करावा. तो परमेश्वराला यज्ञ होईल तुम्ही त्याची मान मोडावी प्रत्येक प्रथम जन्मलेला मुलगा सुध्दा मोबदला देऊन सोडवून घ्यावा.
14 “पुढील काळीं तुमची मुले बाळे विचारतील की तुम्ही असे का करिता म्हणजे हा सण का पाळिता? ते म्हणतील, ‘या सर्वाचा अर्थ काय?’ तेव्हा तुम्ही उत्तर द्यावे, ‘आम्ही मिसरमध्ये गुलामगिरीत होतो परंतु परमेश्वराने आपल्या महान सामर्थ्याने आम्हाला मिसरमधून सोडवून येथे आणले.
15 मिसरचा राजा फारो ह्याने आम्हांस मिसर सोडून जाऊ देण्याचे नाकारले; परंतु परमेश्वराने मिसरमधील प्रथम जन्मलेली मुले व पशुमधील प्रथम जन्मलेले नर मारून टाकले; आणि म्हणूनच आम्ही पशूमधील प्रथम जन्मलेले नर परमेश्वराला देऊन टाकतो आणि प्रथम जन्मलेली मुले आम्ही परमेश्वराकडून सोडवून घेतो.’
16 हा सण म्हणजे जणू काय आठवणीसाठी हाताला बांधलेल्या दोरीच्या खुणे सारखा व डोव्व्यांच्या दरम्यानच्या कपाळपट्टी सारखा आहे. परमेश्वराने आपल्या महान सामर्थ्याने आम्हाला मिसर देशातून बाहेर आणले त्याची आठवण देण्यास हा दिवस मदत करतो.”
17 फारोने इस्राएल लोकांना मिसर सोडून जाऊ दिले, परंतु परमेश्वराने लोकांना पलिष्टी लोकांच्या देशातून जवळची वाट असताना देखील त्यातून जाऊ दिले नाही; कारण परमेश्वर म्हणाला, “त्यांना त्यातून जाताना लढावे लागेल आणि मग त्यामुळे आपल्या मनातले विचार बदलून ते लोक माघारे वळून मिसर देशाला परत जातील.”
18 म्हणून परमेश्वराने त्यांना दुसऱ्या मार्गाने तांबड्या समुद्राजवळील रानातून नेले. इस्राएल लोक मिसरमधून सशस्त्र होऊन निघाले होते.
19 मोशेने योसेफाच्या अस्थी आपल्याबरोबर घेतल्या (कारण मरण्यापूर्वी योसेफाने आपनाकरिता इस्राएली पुत्रांकडून वचन घेतले होते. तो म्हणाला होता, “परमेश्वर जेव्हा तुम्हाला मिसरमधून सोडवील तेव्हा माझ्या अस्थी मिसरमधून घेऊन जाण्याची आठवण ठेवा.”)
20 इस्राएल लोकांनी सुक्कोथ हे ठिकाण सोडले व रानाजवळील एथाम या ठिकाणी त्यांनी तळ दिला.
21 दिवसा त्यांना मार्ग दाखविण्यासाठी उंच ढगाची व रात्री उंच अग्निस्तंभाची योजना करून परमेश्वर त्यांच्या पुढे चालत असे. लोकांना रात्रीही प्रवास करता यावा यासाठी तो ढग त्यांना रात्री प्रकाश देत असे.
22 दिवसा तो उंच ढग व रात्री तो अग्निस्तंभ सतत त्या लोकांबरोबर असत.