उत्पत्ति
धडा 19
त्या दिवशी संध्याकाळी ते दोन देवदूत सदोम नगरात आले. नगराच्या वेशी जवळ बसलेल्या लोटाने त्यांस पाहिले; लोट उठून त्यांस सामोरा गेला आणि त्याने त्यांस आदराने लवून नमल केले.
2 लोट त्यांस म्हणाला, “माझे स्वामी महाराज, कृपया माझ्या घरी या; मला आपली सेवा करु द्या; तेथे तुम्ही आपले पाय धुवा, आजची रात्र रहा; मग उद्या तुमच्या पुढील प्रवासास निघा.”त्या देवदूतांनी उत्तर दिले, “नाही नाही, आम्ही रात्री वेशीजवळील चौकात मुक्काम करु.”
3 परंतु लोट त्यांना पुन्हा पुन्हा विनंती करीतच राहिला; तेव्हा देवदूतांनी त्याची विनंती मान्य केली व ते त्याच्या घरी मुक्कामास गेले. लोट याने त्यास पिण्यास पाणी दिले, त्याने त्यांच्यासाठी भाकरी केल्या व ते जेवले.
4 त्या रात्री झोपण्याच्या वेळेपूर्वी त्या नगराच्या सर्व भागातून पुरुष तरुण आणि वृध्द असे सर्वच पुरुष लोटाच्या घरी आले; त्या सदोमकर पुरुषांनी लोटाच्या घराला गरडा घातला व त्यांनी लोटाला हाक मारत म्हटले.
5 “आज रात्री तुझ्या घरी आलेले ते दोन पुरुष (देवदूत) कोठे आहेत? त्यांना आमच्याकडे बाहेर आण; म्हणजे आम्ही त्यांच्याशी समागम करु.”
6 लोट घरातून बाहेर आला व त्याने आपल्यामागे घराचे दार बंद केले.
7 लोट त्या सदोमकर लोकांना म्हणाला, “नाही, नाही, माझ्या बंधूनो! मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की तुम्ही असे भयंकर वाईट काम करु नका.
8 पाहा, माझ्या दोन मुली आहेत; त्यांचा अद्याप कोणाही पुरुषाशी संबंध आला नाही; त्या शुद्ध कुमारी आहेत; मी त्यांना तुमच्या स्वाधीन करतो. तुमच्या मर्जीस येईल तसे तुम्ही त्यांच्याशी वागा; परंतु ह्या पुरुषांना (देवदूतांना) काहीही करु नका; ते माझ्या घरी पाहुणे म्हणून आले आहेत आणि त्यांचे रक्षण करणे माझे प्रथम कर्तव्य आहे.”
9 तेव्हा सभोंवतालचे घेरा टाकलेले लोक म्हणाले, “चल हो बाजूला.” नंतर ते आपापसात म्हणू लागले, “हा लोट आमच्या नगरात पाहुणा म्हणून आला आणि आता आम्ही काय करावे हे हा उपरा आम्हाला शिकवू पाहतो काय?” मग ते लोक लोटाला म्हणाले, “अरे, आम्ही त्या पाहुण्यांशी जेवढे दुष्टपणे वागूं त्यापेक्षा अधिक दुष्टतेने व वाईट रीतीने तुझ्याशी वागू, समजलास!” तेव्हा ते लोक लोटाच्या अधिक जवळ जवळ येऊ लागले व घराचा दरवाजा तोडण्यास ते पुढे सरसावले.
10 परंतु लोटाच्या घरातील त्या दोन पाहुण्यांनी दार उघडले व लोटाला मागे ओढून घरात घेतले, आणि दार बंद केले.
11 त्या दोन पुरुषांनी दारा बाहेरील लोकांस आंधळे केले; म्हणून घरात घुसण्याचा प्रयत्न करणारे ते सर्व तरुण व म्हातारे आंधळे झाले, त्यामुळे अखेर पर्यंत त्यांना घराचे दार सापडलेच नाहीं.
12 ते दोन पुरुष लोटाला म्हणाले, “तुझ्या कुटुंबातील व नात्यातील इतर कोणी लोक म्हणजे तुझे जांवई, मुलगे, मुली किवां इतर नातेवाईक या नगरात आहेत काय? तसे कोणी असतील तर त्यांना आता ताबडतोब हे शहर सोडून बाहेर पडण्यास सांग;
13 कारण आम्ही या नगराचा नाश करणार आहोत. हे नगर किती वाईट आहे ते परमेश्वराने ऐकले आहे आणि म्हणून त्याने आम्हाला या नगराचा नाश करण्यासाठी पाठवले आहे.”
14 म्हणून मग लोट बाहेर गेला व आपल्या जावयांस भेटला. तो त्यांना म्हणाला, “चला उठा, त्वरा करा, व हे शहर सोडून लवकर बाहेर पडा; कारण परमेश्वर या नगराचा नाश करणार आहे.” परंतु लोट गंमत करीत आहे असे त्याच्या जावयांस वाटले.
15 दुसऱ्या दिवशी पहाटे ते दूत लोटाला घाईकरुन म्हणालें, “उठ, ह्या नगराला ताडण होणार आहे; तेव्हा तू तुझी बायको व तुझ्या जवळ असलेल्या तुझ्या दोन मुली यांस घेऊन ताबडतोब येथून नीघ; म्हणजे मग या नगराबरोबर तुमचा नाश होणार नाही, तर तुम्ही आपले जीव वाचवाल.”
16 परंतु लोट एकदम गोंधळून गेला व दिरंगाई करु लागला; तेव्हा त्या दोन पुरुषांनी (देवदूतांनी) लोट, त्याची बायको आणि त्याच्या दोन मुली यांचे हात धरुन त्यांस सुरक्षितपणे नगराबाहेर नेले. परमेश्वराने अशा रीतीने लोट व त्याच्या कुटुंबियावर दया केली.
17 नगराबाहेर आल्यावर त्या देवदूतापैकी एक जण म्हणाला, “आता पळा व तुमचे जीव वांचवा, नगराकडे मागे वळून पाहू नका आणि या खोऱ्यात कोणत्याही ठिकाणी थांबू नका; पर्वतावर जाईपर्यंत पळत राहा जर का मधे कोठे थांबला, तर नगराबरोबर तुमचाही नाश होईल.”
18 परंतु लोट त्या दोन देवदूतांना म्हणाला, “प्रभू! इतके दूर पळत जाण्याची माझ्यावर सक्ती करु नका,
19 मी तर तुमच्या दासासारखा आहे; पण मला वांचविण्यासाठी तुम्ही माझ्यावर खूप दया केली आहे. मी डोंगरापर्यंत पळत जाऊ शकणार नाहीं; जर मी अगदी सावकाश पळू लागलो तर काहीतरी विपरीत व वाईट घडेल व मी मरुन जाईन.
20 परंतु पाहा, येथे जवळच फार लहान गांव आहे; तेथे जाण्याची मला परवानगी असावी, त्या गावापर्यंत पळत जाऊन मी सुरक्षित राहू शकतो.”
21 तेव्हा देवदूत लोटाला म्हणाला, “ठीक आहे, मी तसेही करण्यास तुला परवानगी देतो; मी त्या नगराचा नाश करणार नाही;
22 पण तेथे लवकर पळत जा. तू तेथे सुरक्षितपणे जाऊन पोहोंचेपर्यंत मला सदोम नगराचा नाश करता येणार नाही.” (लहान असल्यामुळे त्या गांवाला तेव्हापासून सोअर असे नाव पडले.)
23 लोट सोअर गांवात पाऊल टाकीत असताना सकाळ झाली व सूर्य तेजाने प्रकाशू लागला,
24 आणि परमेश्वराने सदोम व गमोरा या नगरांचा नाश करायला सुरुवात केली; त्याने आकाशातून त्या नगरावर गंधक व अग्नी यांचा वर्षाव केला;
25 अशा रीतीने परमेवराने सदोम व गमोरा या नगरांचा तसेच त्या सगळ्या खोऱ्याचा म्हणजे त्या तळवटीत राहाणाऱ्या सगळ्या माणसांचा, पशूंचा व वनस्पतींचा नाश केला.
26 लोट व त्याचे कुटुंबीय नगरातून पळून जात असताना लोटाच्या बायकोने मागे वळून जळणाऱ्या नगराकडे पाहिले तेव्हा तत्काळ ती मिठाचा खांब झाली.
27 त्याच दिवशी पहाटे अब्राहाम उठला आणि आदल्या दिवशी तो परमेश्वरासमोर ज्या ठिकाणी उभा राहिला होता तेथे गेला.
28 त्याने तेथून सदोम व गमोरा नगराकडे व संबंध खोऱ्यातील तळवटीच्या प्रदेशाकडे नजर टाकली तेव्हा तो अवघा प्रदेश म्हणजे भल्यामोठ्या अग्नीच्या ज्वालांनी व धुराच्या लोटांनी भरलेला त्याला दिसला.
29 देवाने त्या खोऱ्यातील नगरांचा अशा रीतीने नाश केला परंतु तो करीत असताना, अब्राहामाने त्याला विचारलेल्या गोष्टींची त्याने आठवण ठेवली; लोट (अब्राहामचा पुतण्या) दरीतील नगरांत राहात होता. पण नगरांचा नाश करण्यापूर्वी देवाने लोटाला तेथून दूर पाठवून दिले होते.
30 या नंतर अधिक काळ सोअरात राहण्यास लोटाला भीती वाटली; तेव्हा तो त्याच्या मुलींना घेऊन डोंगरात एका गुहेत जाऊन राहिला.
31 एके दिवशी वडील मुलगी धाकटीला म्हणाली, “पृथ्वीवर जिकडे तिकडे स्री पुरुष लग्न करुन राहतात, आपले वडील म्हातारे होत राहिले आहेत; आणि या भागात आपल्याबरोबर लग्न करण्यास एकही पुरुष नाही;
32 तर आता आपणाला मुले होण्याकरिता आपण आपल्या वडिलांचा उपयोग करु, तेव्हा आपण आपल्या वडिलाकडे जाऊन त्यांना भरपूर द्राक्षमद्य पाजू आणि मग त्यांच्यापाशी निजू म्हणजे मग त्यामुळे आपला वंश चालू राहील.”
33 त्याच रात्री त्या दोघी मुली वडिलांकडे गेल्या आणि त्यांना त्यानी द्राक्षमद्य पाजले; नंतर वडील मुलगी आपल्या वडिलांच्या बिछान्यात गेली व त्यांच्याजवळ निजली; पण द्राक्षमद्याच्या नशेमुळे ती आपल्याजवळ निजली हे लोटाला कळले नाही.
34 दुसऱ्या दिवशी वडील बहीण धाकट्या बहिणीला म्हणाली, “मी काल रात्री आपल्या वडिलाजवळ निजले, तर आज रात्री पुन्हा आपण वडिलांना द्राक्षमद्य पाजू या, मग रात्री तू वडिलांच्या बिछान्यात जाऊन त्याच्याजवळ नीज. अशा प्रकारे आपण त्याना मुले होऊ देऊ व आपल्या वडिलांचा वंश चालविण्यास त्यांचा उपयोग करु.”
35 तेव्हा त्या रात्री त्या दोन मुलींनी आपल्या वडिलानां द्राक्षमद्य पाजला; नंतर धाकटी मुलगी आपल्या वडिलांच्या बिछान्यात गेली व त्यांच्याजवळ निजली; यावेळी ही नशेमुळे आपली मुलगी आपल्याजवळ निजली हे लोटाला समजले नाहीं.
36 अशा रीतीने लोटाच्या दोन्हीही मुली गरोदर राहिल्या. त्यांचे वडीलच त्यांच्या बांळांचे वडील होते.
37 थोरल्या मुलीला मुलगा झाला, तेव्हा तिने त्याचे नाव मवाब ठेवले; आजतागायत राहात असलेल्या मवाबी लोकांचा हा मूळ पुरुष,
38 धाकट्या मुलीलाही मुलगा झाला; तिने त्याचे नाव बेनअम्मी असे ठेवले; आजमितीला जे अम्मोनी लोक आहेत त्यांचा हा मूळ पुरुष.